पान:विज्ञान-प्रणीत समाजरचना.pdf/१२७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१२१)

पण सुखदुःख मोजण्याच्या साधनांचा थोडासा विचार केला आहे. ज्या समाजात (१) आत्महत्त्येचे प्रमाण वाढत आहे, (२) वेड लागण्याचे प्रमाण वाढत आहे (३) व उपदंशादि रोगांचा फैलाव होत आहे, तो समाज अधःपाताकडे चालला आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. हे मुद्दे महत्त्वाचे व खरे आहेत यात शंका नाही; पण त्यांचे जोशीकृत विवेचन कसे मासलेवाईक आहे, ते पाहण्यासारखे आहे. दोनचार पानांच्या अंतराने केलेली जोशी यांची पुढील तीन विधाने वाचून कोणालाही मौज वाटेल (१) ज्या राष्ट्रांत वेड लागण्याचे प्रमाण जास्त तेथे आत्महत्त्येचे प्रमाण कमी असते (पान २७५), (२) जे समाज अस्थिर आहेत, म्हणजे ज्यांची प्रगती चालली आहे. त्यांत आत्महत्येची प्रवृत्ती वाढत आहे. (२८२), (३) सर्व सुधारलेल्या (प्रगतिमान्) समाजात वेडाचे प्रमाण वाढत आहे. (२८६) वेड आणि आत्महत्या ही एकत्र नसतात असे एकदा म्हणून लगेच पुन्हा सर्व प्रगतिमान् समाजात ही दोन्ही वाढत आहेत, असे जोशांना म्हणावयाचे आहे. साहेबाचे ग्रंथ वाचताना चांगले मुद्दे आढळले तरी ते उतरून घेऊन आपल्या लिखाणात मांडताना विचार करावा लागतो हे जोशीबुवांना पसत नाही असे दिसते. पण त्यांनी जरी आपल्याच म्हणण्याचा विचका केला असला तरी त्यांतील मुद्दा खरा असल्यामुळेच तेवढाच समजावून घेऊन त्याचा आपणास विचार केला पाहिजे.
 समाजात आत्महत्येचे प्रमाण वाढणे, हे समाजाच्या दुःस्थितीचे लक्षण आहे, यात शंकाच नाही; आणि स्त्री, पुत्र, राष्ट्र इत्यादी बाह्य निष्ठास्थाने म्हणजे माणसाचे मन येथे खेचून धरणाऱ्या गोष्टी जितक्या जास्त तितका तो आत्महत्येस कमी प्रवृत्त होतो, हेही खरे आहे. पण बाह्य निष्ठास्थाने कमी असणे एवढेच कारण पुरेसे नाही. आपण घटस्फोटाचे उदाहरण घेऊ. सुधारलेला समाज घेतला तर ज्यांचे घटस्फोट झाले त्यांच्यामध्ये, ज्यांनी केले नाहीत त्यांच्यापेक्षा आत्महत्येचे प्रमाण दुप्पट सापडते हे खरे, पण जेथे जेथे घटस्फोट तेथे तेथे तो नसलेल्यांच्या पेक्षा प्रमाण दुप्पट हे जोशांचे म्हणणे खरे नाही. महाराष्ट्र सांवत्सरिकांतील जातिपरिचय जरी त्यांनी वाचला असता तरी त्यांच्या ध्यानात आले असते की थोड्या थोडक्या नाही तर येथल्या दीडशे जातीत घटस्फोट आहे. तरी पण तेथे आत्महत्या नाही. तेव्हा आत्महत्येला बाह्य निष्ठास्थान ढळणे याशिवाय आणखी काही तरी लागते