पान:विज्ञान-प्रणीत समाजरचना.pdf/१२९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१२३)

आहे. स्त्री व पुरुष या दोघांचे व्यक्तित्व कायम ठेवावयाचे, संस्कृती कायम ठेवावयाची व तरीसुद्धा हा दोष निर्माण होऊ द्यावयचा नाही, हे अजून कोणालाच साधले नाही. हिंदूनी त्या बाबतीत व्यर्थ ऐट मारण्यात अर्थ नाही. ज्ञानाबरोबर दुःखे येतात त्यातलेच हे एक आहे, पण त्याला इलाज काय! स्त्रीचे व्यक्तित्व नाहीसे करून तिला पशुकोटीत ढकलणे, किंवा कातकरी जीवनास तयार होणे, हा त्यावर खास उपाय नाही. स्त्रीच्या व्यक्तित्वांचे हे फाजिल स्तोम आहे असे काही लोक म्हणतील; पारतंत्र्यामुळे स्त्री पशुवत् होते, हे त्यांना खोटे वाटेल. त्यांना विनंती एवढीच की त्यांनी हा प्रयोग स्वतःवर करून पाहावा.
 आत्महत्येसारखाच दुसरा दोष म्हणजे वेड लागणे. हे युरोपीय समाजांत वाढत आहे हे खरे आहे; पण ते समाजाच्या अव्यवस्थेचे द्योतक नसून फाजील व्यवस्थेचे द्योतक आहे, असे हॅवलॉक एलिसने म्हटले आहे ते खरे आहे. इस्पितळे, अनाथालये ही अलीकडे इतकी वाढली आहेत, की चांगल्या माणसांच्या बरोबरचं वेडी अर्धवट माणसे, जी पूर्वी निसर्गाच्या तडाख्यात मरून गेली असती ती पण जगू लागली. त्यांना सुस्थिती मिळाल्यामुळे त्यांची प्रजाही फार वाढू लागली. तेव्हा समाजाने जी जास्त व्यवस्था केली, तिचे हे फल आहे. पण विचारी लोकांचे आता तिकडे लक्ष गेले आहे व अशा लोकांना निरपत्य करून टाकण्यांची त्यांनी मोहीमच सुरू केली आहे. त्यामुळे त्या दोषांकडे बोट दाखविण्यात अर्थ नाही. सुधारणेचा व वेडाच्या वाढीचा यापेक्षा निराळा सबंध काही नाही.
 उपदंशादि रोगाचे प्रमाण युरोपीय लोकांत वाढत आहे हे खरे आहे. आणि ते अवनतीचे लक्षण आहे यातही शंका नाही. पण तेवढ्या एकाच प्रमाणावरून श्रेष्ठकनिष्ठता ठरविणे कितपत युक्त होईल, याचा वाचकांनी विचार करावा. आणि दुसरे असे की हिंदी लोकांचे सरासरी आयुर्मान फार कमी म्हणजे तेवीस आहे हे आपल्या हिताचेच आहे, असे रा. जोशी यांनी सुंडबर्ग नावाच्या साहेबाच्या आधाराने दाखविलेच आहे, (पान ३३३). आणि उपदंशादि रोगांनी ते आणखी कमी होईल हे स्पष्ट दिसत असताना त्यांच्या प्रसाराविरुद्ध तक्रार करणे निदान जोशांना तरी शोभत नाही.
 श्रेष्ठकनिष्ठतेच्या जेवढ्या म्हणून कसोट्या उपलब्ध आहेत तेवढयांचा