पान:विज्ञान-प्रणीत समाजरचना.pdf/१३१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१२५)

त्या काळी जे समाज सुसंस्कृत होते, त्यांच्यात एका माणसाला दुसऱ्या माणसाबद्दल त्या काळी जे प्रेम वाटत असे, त्यांत व आताच्या स्थितीत काही फरक आहे असे वाटत नाही. थोडक्यांत असे की, सत्यनिष्ठा, बंधुभाव वगैरे सद्गुणांची जी उंची वेदकाळी होती तीच आज आहे, त्यांत सुधारणा झाली नाही, हे खरे आहे इतकेच नव्हे तर पुढे कधी होईल, असा आशेचा किरण क्षितिजावरसुद्धा दिसत नाही. पण आठदहा हजार वर्षांपूर्वी जी स्थिती होती, तीच पन्नास हजार वर्षापूर्वी होती, असे म्हणता येणार नाही. हिंदी, मिसरी, चिनी वगैरे संस्कृतीचे लोक केव्हा तरी आफ्रिकेतल्या रहिवाश्यांच्या स्थितीत होतेच. आणि त्या स्थितीतून ते वर आले असे दिसत असताना नीतिदृष्ट्या प्रगती झाली नाही ह्या म्हणण्यात तरी काय अर्थ आहे ?
 आणि तसा अर्थ नसेल तर प्रगती अमान्य करता येणार नाही. कोणचाही एक कालखंड घेतला तर त्यांत आजच्यापेक्षा उद्या बरी स्थिती प्राप्त करून घेण्याकडे माणसाने दृष्टी ठेवणे हेच खरे जिवंतपणाचे लक्षण आहे. बरी स्थिती कोणची ते वर सांगितलेच आहे. ती स्थिती ज्याला आली असेल तो समाज सुसंस्कृत होय. केवळ टिकून राहिलो येवढ्यातच फुशारकी मारण्यात काही अर्थ नाही. अगोदर तेही खरे नाही, पण ते आहे असे धरले तरी त्यांत पराक्रम किंवा मोठेपणा काहीच नाही. आफ्रिकेतले नीग्रोही टिकून राहिलेलेच आहेत आणि ढेकूण व पिसवा याही टिकून राहिल्या आहेत. मानवाला ते जिणे आवडत नाही म्हणून तर सर्व खटाटोप आहे. तो मूल हेतूच ज्यांना अमान्य करावयाचा असेल, त्यांनी हिंदू समाज सुस्थितीत आहे असे म्हणावे. इतरांना तसे म्हणणे लज्जास्पद वाटेल. यावच्चंद्रदिवाकर टिकून राहावे ही ईर्षा तर आहेच, पण ते मानाने टिकून राहावे अशी दुसरीही ईर्षा आहे. आणि या दोहोंचा खटका आला तर मानी पुरुष दुसरीचीच किंमत जास्त करील. आणि तसेच करण्याकडे या जुनाट भारत देशाची प्रवृत्ती व्हावी त्याने आपली सनातन शांतता सोडून देऊन थोडी अस्वस्थता व अस्थिरता धारण करावी, अशी शुभेच्छा प्रगट करून संस्कृतीचे हे लांबलेले विवेचन पुरे करतो.