पान:विज्ञान-प्रणीत समाजरचना.pdf/१३२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



विवाहसंस्थेचे भवितव्य.



 विसावे शतक हे क्रांतीचे शतक आहे. जूनी राज्ये व साम्राज्येच यात उलथून पडत आहेत असे नसून त्या साम्राज्यांपेक्षाही जास्त दृढमूल झालेली तत्त्वे व त्याहीपेक्षा जास्त जुन्या व विश्वमान्य अशा संस्था याही आता ढासळून पडत आहेत. शास्त्रांच्या वाढीमुळे परमेश्वराच्या अस्तित्वावरच गदा आली व त्यामुळे धर्माचे अधिष्ठानच कोसळून काही ठिकाणी पूर्णपणे व इतर ठिकाणी पुष्कळसा धर्माचा उच्छेद झाला आहे व धर्माइतकीच जुनी व कदाचित् त्यापेक्षाही जास्त प्रिय अशी जी विवाहसंस्था तीही त्याच मार्गाने जाणार की काय अशी पुष्कळांना भीती वाटू लागली आहे. कॅल्व्हर्डनचे बँकरप्टसी ऑफ मॅरेज, बेन लिंडसे यांचे रिव्होल्ट ऑफ मॉडर्न यूथ यासारखी पुस्तके वाचली म्हणजे युरोप व अमेरिका या खंडांत विवाहसंस्था किती हीन दशेला पोचली आहे हे ध्यानांत येईल. बर्लिन, बोस्टन, लंडन यांसारख्या शहरांत दर हजारी तीनशे पासून पांचशेपर्यंत मुले बेकायदेशीर असतात. न्यूयार्कमध्ये दरसाल ८०००० गर्भपात होतात; अविवाहित मातांसाठी काढलेली इस्पितळे कोठेच पुरेनाशी झाली आहेत व दर दहा लग्नांमागे दोन किंवा तीन व काही ठिकाणी तर पाचपर्यंत घटस्फोट होतात. ही माहिती तिकडील विवाहसंस्थेचे स्वरूप समजवून देण्यास पुरेशी आहे. रशियामध्ये तर विवाह हा अनवश्यकच झालेला असून कोठलीच संतति विधिबाह्य नाही असे सरकारने ठरवून टाकले आहे. व तेच धोरण अमेरिका व इंग्लंड यांनी स्वीकारावे असे लिंडसे, हॅवलॉक एलिस वगैरे मोठमोठे लेखक सांगत आहेत.
 आज हजारो वर्षे चिरस्थायी झालेली ही संस्था एका पाचपन्नास वर्षांच्या अवधीत अगदी रसातळाला जाऊन पोचण्याजोगी अशी काय परिस्थिती उत्पन्न झाली आहे, असा आपणापुढे प्रश्न येऊन पडतो. त्याचा उहापोह एलिस, रसेल वगैरे अनेक पंडितांनी केला आहे. नॅशा- पालमाल मासिकाच्या जानेवारी १९३३ च्या अंकात रसेलने विवाहसंस्था ढासळण्याची सर्व कारणे फार थोडक्यात पण स्पष्टपणे दिली आहेत. (१) स्त्री ही वस्तुरूप टाकून व्यक्तीरूप पावली. (२) तिला आर्थिक स्वातंत्र्य मिळाले. (३) समागम करूनही गर्भसंभव