पान:विज्ञान-प्रणीत समाजरचना.pdf/१३३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१२७)

टाळणे विज्ञानाने शक्य करून दिले. (४) घटस्फोट पूर्वीपेक्षा पुष्कळ सोपा झाला. (५) पुरुषाच्या द्रव्यार्जनाची सुरुवात विसाव्या वर्षावरून निघून तिसाव्या वर्षावर गेली व त्यामुळे समागमाची इच्छा व तृप्ती यात अंतर पडले; ही पाच कारणे प्रमखपणे सांगण्यांत येतात. मोटार वगैरे थोडक्या वेळात लांब नेणारी वाहने, धर्मविचाराचे शैथिल्य, हीही कारणे त्यांच्या जोडीला कोणी सांगतात. शिशुसंगोपन व मुलांचे शिक्षण यांची पुष्कळशी जबाबदारी माता- पित्यावरून काढून सरकारने आपल्याकडे घेतली हेही कारण अनेकांनी सांगितले आहे. विवाहसंस्थेला लागलेले हे अनेक सुरुंग असून त्यांच्यामुळे ही शाश्वत वाटणारी इमारत पुढील पाचपन्नास वर्षांत जमीनदोस्त होऊन जाईल असे पुष्कळांचे म्हणणे आहे. स्ट्रिंडबर्ग किंवा रशियांतील मॅडम कोलॉन टाई यांसारख्या काही लोकांना यात वाईट असे काही वाटत नसून ही संस्था व विशेषतः गृहसंस्था नष्ट झालेली उत्तमच, असे त्यांचे मत आहे. तेव्हा त्याप्रमाणे ही संस्था खरोखरच नष्ट होईल की काय, होणे अवश्य आहे की काय, का वर सांगितलेले सुरुंग हे सुरुंग नसून हॅवलॉक एलिस म्हणतो (व्हिदर मनकाइंड. पृ. २१४) त्याप्रमाणे हे त्या संस्थेचे घिरे आहेत, व त्यामुळे ती संस्था कोसळण्याऐवजी जास्तच भक्कम होणार आहे, याचा आपणास प्रस्तुत लेखांत विचार करावयाचा आहे.
 कोणतीही संस्था टिकेल का मोडेल याचा विचार करण्याची सरळ व एकच पद्धत म्हणजे तिच्या आदिहेतूंची चिकित्सा करणे ही होय. ज्या कारणासाठी ती संस्था अस्तित्वांत आली असेल ती कारणे जर अविनाशी असतील व जी कार्ये ती करीत असेल ती अजूनही समाजाला इष्ट असतील, तर ती संस्था टिकेल, किंवा निदान समाज ती टिकवून धरावयाचा प्रयत्न करील हे अगदी उघड आहे. विवाहाच्या बाबतीत अशी कारणे तीन आहेत. समागमाचे सुख मिळविणे, व सुप्रजा निर्माण करणे हे दोन हेतु कोणाच्याही सहज डोळयांपुढे येतील असे आहेत. तिसराही एक हेतू आहे. पण त्याचा पुढे विचार करणे जास्त सोयीचे आहे.
 समागमाचे सुख मिळविणे हा विवाहसंस्थेचा हेतु म्हणून सांगितला, हे पाहून जुन्या धार्मिक पंडितांना क्रोध येईल. कोणत्याही तऱ्हेचे शारीरिक सुख मिळविण्याचा प्रयत्न करणे ही मोठी लज्जास्पद व निंद्य गोष्ट आहे अशी