पान:विज्ञान-प्रणीत समाजरचना.pdf/१३४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१२८)

आतापर्यंतच्या सर्व धर्ममतांची शिकवण आहे. त्यातल्या त्यात स्त्रीसमागमाचे सुख हे तर अत्यंत निंद्य व पापमय असून त्याची नुसती इच्छा धरणे हे अगदी हीनतेचे धोतक आहे, ते दौर्बल्य आहे, असे सांगण्याची चाल होती. जुन्या अनेक धर्मग्रंथात विवाहाला परवानगी आहे. पण ती प्रजोत्पादनासाठी आहे. विषयसुख हे नाइलाज म्हणून भोगावयाचे. ते टाळता आले तर बरे; पण तसे सर्वांना शक्य नाही म्हणून विकारांना एक वाट करून द्यावयाच्या हेतूने जुने लोक विवाहाला परवानगी देतात. त्यामुळे विषयसुखाची इच्छा धरणे ही एक लाजिरवाणी गोष्ट आहे असे सर्व जण बोलण्यापुरते तरी मानीत असत. अशा प्रकारच्या धोरणामुळे समागमाचे सुख अनुभवणे हा विवाहाच्या प्रधान हेतूंपैकी एक म्हणून मान्य करणे जुन्या काळी कधीच शक्य नव्हते. त्यांच्या मते प्रजा निर्माण करून पितरांच्या ऋणांतून मुक्त होणे, हे एक धार्मिक कर्तव्य असल्यामुळे त्याचे साधन म्हणून पुरुषाने विवाह करावयाचा असतो. त्यामुळे विवाहाचे प्रजोत्पत्ती हे एकमेव ध्येय असले पाहिजे, सुखासाठी समागम करणं हे चूक आहे असे सनातनी लोक सांगतात व जुन्या काळी ते तसेच होते असे सांगून 'प्रजायै गृहमेधिनाम्' हे कालिदासाचे वचन बाणासारखे प्रतिपक्षावर फेकतात.
 आपल्याकडे जुन्याचा कैवार घेऊन अर्थहीन व ढोंगी बडबड करण्याची जी पद्धत अलीकडे रूढ होत चालली आहे, तिचा हा एक उत्कृष्ट नमुना आहे. पश्चिमेकडच्या अनेक पंडितांनी व तरुणांनी प्रजा (Procreation) हे विवाहाचे एकमेव ध्येय आम्हाला मुळीच मान्य नसून विषयानंद (recreation) हाही एक त्यात हेतू आहे, इतकेच नव्हे तर केवळ विषयानंदाच्या हेतूनेच लग्न करणे हेही पूर्णपणे न्याय्य आहे असे सांगण्यास निर्भयपणे सुरुवात केली आहे. त्याची टर करण्यासाठी काही सनातनी शास्त्री व काही सुशिक्षित हरदास नेहमी टीका करतात की 'प्रजायं गृहमेधिनाम्' हे उदात्त धोरण टाकून 'मजायै गृहमेधिनाम्' हे धोरण अलीकडच्या लोकांनी पत्करले आहे. वास्तविक मौज अशी आहे की, कालिदासाच्या ज्या 'प्रजायै गृहमेधिनाम्' या वाक्यावर या लोकांच्या एवढ्या उड्या आहेत त्याच्याच पुढचे वाक्य जर हे लोक वाचतील तर त्यांची उडी खड्ड्यातच जाईल. पुढच्याच श्लोकात 'यौवने विषयैषिणाम्' असेही कवीने रघुराजाचे वर्णन केले आहे. यावरून