पान:विज्ञान-प्रणीत समाजरचना.pdf/१३५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१२९)

केवळ प्रजेच्याच हेतूने रघुराजे लग्न करीत नसून विषयानंद हाही पण त्यांना प्रिय होता असे दिसते. पण एवढ्या एकाच श्लोकाने काय झाले आहे ? विदग्ध वाङमय म्हणून संस्कृतात जो भाग आहे त्यात विवाहाचे सर्व थोर हेतू बाजूस राहून अधम, पाशवी विषयानदच कसा थैमान घालीत आहे, हे कोणाही वाचकाच्या ध्यानात येण्याजोगे आहे. अनेक संस्कृत नाटकात कवींनी ज्यांची चरित्रे गायिली आहेत ते बहुतेक सर्व राजे- चंद्रसूर्य वंशातले धीरोदात्त व सत्त्वशील राजे- 'मजायै' याच धोरणाने चालत असत, असे दिसेल. तेथून ऐतिहासिक कालाकडे दृष्टी टाकली तरी तीच स्थिती दिसते. सर्व मराठी राजे, पेशवे, सरदार, मानकरी मजायै हाच हेतू तोंडाने नसला तरी मनाने खास प्रमुख मानीन होते. सामान्य जनांतही हेच धोरण होते. समागमाचा हेतू प्रजा हाच असला पाहिजे हे धोरण स्त्रियांच्या बाबतीतच फक्त पुरुषांनी ठेवले होते, पुरुषांनी अनेक स्त्रिया करून किंवा अन्य मार्गानेही मजा करण्यास कोणाचीच हरकत नव्हती.
 जुन्या व नव्यामध्ये फरक इतकाच आहे की विषयानंद हा एक सुखाचा उत्तम प्रकार असून तो अनुभवण्यात लज्जास्पद काही एक नाही व तो मान- वाच्या कोणच्याही प्रकारच्या उन्नतीच्या आड येत नाही, असे नवे पंडित निर्भयपणे सांगतात व जुने सांगत नाहीत. जुन्यांची कृती मात्र तीच असतें. पण त्यात उजळ माथा नसल्याने विषयसुखाची चर्चा करून ते जास्त कल्याण- कारक, हितप्रद व सुसंस्कृत कसे करावे याची जी नव्यांना चर्चा करता येते, ती मात्र त्यांना शक्य नाही. व त्यामुळे हीन प्रकारचे सुखच फक्त आतापर्यंत ते अनुभवीत आले आहेत.
 विषयसुखाच्या बाबतीतली ही भेकड व अप्रामाणिक वृत्ती नव्यांनी टाकून दिली आहे. व त्यामुळे मानवाच्या सुखात जास्त भर पडण्याचा संभव आहे, यात शंकाच नाही. स्त्रीपुरुषांनी, विशेषतः स्त्रियांनी अतिशय मोहक व वेधक वेषभूषा करावी यात जुन्यांना फार भयंकर पाप वाटे. मुलगी पाहावयास गेल्यावर ते सुंदर मुलगीच निवडतील; पण तिने जास्त सुंदर दिसण्याचा प्रयत्न केला तर मात्र ते रागावतील. या तऱ्हेचे वेडगळ प्रकार यापुढे नव्या धोरणाने बंद होऊन स्त्रीपुरुष परस्परांना जास्त आकर्षक होण्याचा प्रयत्न करतील तर त्यामुळे विवाहबंधनाची दृढता निःसंशय अधिक होईल. विषया-