पान:विज्ञान-प्रणीत समाजरचना.pdf/१३७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१३१)

स्वतः कडकडून सांगितलेल्या वचनाविरुद्ध ते वागते ना. यावरून एकच गोष्ट दिसते की विषयसुख हे मोक्षाच्या आड येते असे जरी या साधुसंतांना वाटत होते तरी वस्तुस्थिती तशी नव्हती.
 यावरून असे दिसून येईल की प्रेम, भावना, विचार यांची समरसता यामुळे सुसंस्कृत होणारा विषयानंद हा विवाहाचा एक प्रधान हेतू आवश्य मानला पाहिजे, पतिपत्नींची एकमेकांबद्दल एकनिष्ठा आणि त्यांच्या नात्याचा शाश्वतपणा या विवाहाच्या मुख्य अटी आहेत आणि केवळ विकारशमन एवढाच हेतू असेल तर त्याला या तऱ्हेच्या विवाहाची मुळीच जरूर नाही. विवाह नसलेल्या समाजांना ते पूर्णपणे शक्य आहे हे कोणत्याही समंजस माणसाच्या तेव्हाच ध्यानात येईल.
 सुप्रजेचे उत्पादन हा विवाहाचा दुसरा हेतू सांगितला जातो. पुत्रोत्पत्ती करून पितरांना पाणी मिळण्याची व्यवस्था करून ठेवावयाची. व त्यांच्या ऋणांतून मुक्त व्हावयाचे. अशी यात धार्मिक दृष्टी आहे; पण शास्त्रामध्ये या भोळसर कल्पनेचा विचार करणे शक्य नाही दुसरी दृष्टी समाजाची. उत्कृष्ट प्रजा निर्माण व्हावी व समाज उन्नतीला जावा अशी लोकांची नेहमीच इच्छा असते आणि व्यक्ती ही हरएक प्रकारे समाजाची ऋणी असल्यामुळे प्रजा निर्माण करून समाज टिकविणे व ती सुदृढ व्हावी म्हणून दक्षता बाळगणे हे प्रत्येक व्यक्तीचे कर्तव्य आहे.
 पण जरा खोल विचार केला तर असे दिसून येईल की विवाहसंस्था ज्या स्वरूपात आज आपल्या डोळ्यापुढे आहे, त्याची सुप्रजेच्या निर्मितीला. तितकीशी मुळीच जरूर नाही. इतकेच नव्हे तर सुप्रजेच्या दृष्टीने सध्याच्या विवाहसंस्थेत अनेक दोष आहेत. येथे वाचकांनी गैरसमज करून घेऊ नये. सुप्रजा हा विवाहाचा हेतू असावा याबद्दल वादच नाही. पण तो एकमेव हेतू समाजाने पुढे ठेवला तर सध्या असलेल्या एकनिष्ठा व शाश्वतता ही विवाहबंधने कितपत अवश्य आहेत याचा विचार येथे करावयाचा आहे. जीवनशास्त्रदृष्ट्या विचार केला तर सुप्रजेला यातल्या कशाचीच जरूर नाही. स्त्री ज्या पुरुषांशी संगत होते त्यासारखी ती होते वगैरे जुन्या कल्पना आता चुकीच्या ठरल्या आहेत. कालांतराने स्त्रीने अन्य पुरुषापासून संतती निर्माण करून घेतली तरी त्या संततीवर पहिल्या पुरुषाच्या संभोगाचा काही एक परिणाम