पान:विज्ञान-प्रणीत समाजरचना.pdf/१३८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१३२)

होत नाही. त्याचप्रमाणे स्त्रीच्या मानसिक एकनिष्ठेवरही प्रजेचे चांगले वाईटपण मुळी अवलंबून नाही. म्हणजे पुरुष व्यभिचारी असला तरी त्याच्या पुत्राच्या पिंडगत गुणात जसा फरक पडत नाही, तसाच स्त्री व्यभिचारी असली तरी पडत नाही. दुसरे असे की, सुप्रजा हाच अंतिम हेतु धरला तर आज जशी सर्व लोकांना विवाहाला परवानगी आहे तशी त्या समाजात मिळणार नाही. वय, आरोग्य, कर्तृत्व इत्यादी गुणांनी प्रजा निर्माण करण्याला योग्य असे शेकडा दहापंधराच स्त्रीपुरुष सापडतील. आणि मग तेवढ्यानाच प्रजोत्पादनाची परवानगी देणे व बाकीच्यांना निरपत्य करून टाकणे हे श्रेयस्कर ठरेल. शिवाय पती कसाही असला तरी स्त्रीने त्याशी एकनिष्ठ राहणे हा धर्माचा उपदेश जीवशास्त्राला कधीच मान्य होणार नाही. कारण सुप्रजेच्या दृष्टीने तो अगदी चुकीचा आहे मातृप्रधान गृहसंस्था ठेवून प्रत्येक वेळी निरनिराळ्या थोर पुरुषांकडून स्त्रीने पुत्रोत्पत्ती करून घ्यावी अशी काही इंग्रज पंडितांनी सुचविलेली व्यवस्था सुप्रजेच्या दृष्टीने मान्य करावी लागेल. यावरून असे दिसेल की केवळ सुप्रजा हीच अंतिम दृष्टी ठेवली तर उत्तम बीज व उत्तम क्षेत्र एवढी एकच दृष्टी ठेवून बाकी सर्व बंधने झुगारून द्यावी लागतील आणि त्या उत्तम शब्दाची व्यवस्था जीवनशास्त्र सांगेल ती धर्म, किंवा नीती सांगेल ती नव्हे.
 केवळ विकारशमन, किंवा सुप्रजेची निर्मिती हे एकेक निरनिराळे किंवा दोन्ही मिळूनही विवाहसंस्थेचे अंतिम हेतू होऊ शकत नाहीत असे आतापर्यंतच्या विवेचनावरून दिसून येईल. स्त्रीपुरुषाची एकनिष्ठा आणि संबंधाचा शाश्वतपणा ही ज्या नात्यात प्रधान मानली जातात तो विवाह, ही विवाहाची व्याख्या सर्वमान्य होईल असे वाटते. आणि त्या व्याख्येअन्वये विवाह हा विकार शांत करण्यास किंवा पिंडदृष्ट्या सुप्रजेची निर्मिती करण्यास जरूरच आहे असे नाही; किंबहुना काही बाबतीत विवाह हा सुप्रजेच्या व विकारशमनाच्या आडच येईल असे दिसून येईल. धर्मरक्षण किंवा मोक्षप्राप्ती असे काही आणखी हेतु जुने लोक सांगतील; पण त्याची माहिती कोणालाच नीटशी नसल्यामुळे त्यांचा विचार करणे शक्य नाही. मग नव्या शास्त्रीय दृष्टीला विवाहसंस्थेची जरूर आहे की नाही असा प्रश्न येतो आणि त्याचाच आता आपणाला विचार करावयाचा आहे.