पान:विज्ञान-प्रणीत समाजरचना.pdf/१३९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१३३)

 विकारशमनासाठी, किंवा समाज जिला सुप्रजा म्हणेल त्यासाठी जरी विवाहसंस्थेची जरूर नसली तरी यापेक्षाही श्रेष्ठ अशा एका सुखाची मानवी मनाला अपेक्षा असते आणि तिच्यासाठी विवाहाची जरूर आहे.
 मानवी मनाचा असा एक धर्म आहे की आपल्या व केवळ आपल्याच सुखदुःखाची काळजी घेणारी, केवळ आपल्या एकट्याच्याच उत्कर्षाने हर्ष पावणारी व अपकर्षाने खेद पावणारी आणि आपल्या एकट्याच्याच भावनांशी समरस होणारी अशी कोणी तरी व्यक्ती असावी, यात त्याला पराकाष्ठेचे सुख आहे. मी मेलो तर हजारात एक व्यक्ती कमी झाली, या हिशेबाने समाजाला थोडे तरी दुःख होते हे खरे आहे. पण ती समाजाची पातळ सहानुभूता मला मुळीच सुखदायक होऊ शकत नाही. पण मी मेलो तर आपणही मरावे इतके वाईट वाटण्याजोगं दुःख जिला होईल, अशी जर कोणी व्यक्ती असेल, तरच मला जगण्यामध्ये खरा आनंद होतो; आणि अशी जर व्यक्ती कोणीच नसेल तर मला जीवित नकोसे होते. आपल्यावर कोणाची तरी अनन्यसामान्य भक्ती आहे, ही जाणीव केवळ सुखप्रद आहे इतकेच नव्हे तर मानवाच्या सर्व कर्तृत्वाचे ते उगमस्थान आहे. सर्व समाज माझा आहे, ह्यासाठी मला कष्ट केले पाहिजेत ही भावना हजारातील एखाद्याच मनाला चैतन्यप्रद होत असेल. पण माझ्यासाठी, आणि केवळ माझ्याचसाठी तळमळणारी अशी जी व्यक्ती आहे तिचे कल्याण हा हेतू वाटेल त्याला उद्योगरत करण्याला, इतकेच नव्हे तर प्रसंगी प्राणही देण्यास पुरेसा प्रेरक होऊ शकतो. आपल्यावर अनन्यसामान्य भक्ती करणारी ही व्यक्ती कोणीही असून चालत नाही. पुरुषाला ती व्यक्ती स्त्री असावीशी वाटते व स्त्रीला पुरुष असावीशी वाटते. कारण हॅवलॉक एलिसने एके ठिकाणी म्हटल्याप्रमाणे मनाचे पूर्ण मीलन होऊन दोन जीव अगदी अभिन्न होऊन जाण्यास देहाच्या समागमाची सुद्धा अत्यंत जरूर असते. मनाच्या समागमावाचून शारीरिक संबंध हा उच्च आनंद देऊ शकत नाही, हे जितके खरे आहे, तितकेच मनाच्या पूर्ण मीलनाला शारीरसंबंधाची आवश्यकता आहे हेही खरे आहे. म्हणजे स्त्रीच्या किंवा पुरुषाच्या पार्थिव जडदेहाला पुरुषाच्या किंवा स्त्रीच्या पार्थिव देहाच्या समागमाची जशी भूक असते, तसीच त्यांच्या मनालाही दुसऱ्याच्या मनाच्या समागमाशी भूक असते. आणि मनाची भूक अनन्यसामान्य प्रेमाखेरीच शांत