पान:विज्ञान-प्रणीत समाजरचना.pdf/१४०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१३४)

होऊ शकत नाही. मानवाच्या अशा या विशिष्ट मनोधर्मातच विवाहसंस्थेचे बीज आहे.
 इस्पितळातील दाई आपली काळजी घेते, यामुळे आपल्याला अल्पसे सुख होते. पण आपल्या इतक्याच आस्थेने ती दुसऱ्या पन्नास माणसांची काळजी घेत असल्यामुळे त्या आस्थेला पाडळपणा येऊन पन्नास माणसात पडलेले असूनही आपणास निर्जन प्रदेशात पडल्यासारखेच वाटते. घरामध्ये याच्या उलट स्थिती असते आणि यामुळेच घराला घरपणा आलेला असतो. यावरून असे दिसून येईल की प्रेमातील अनन्यसामान्यता हेच सर्व सुखाचे उगमस्थान आहे आणि विवाहसंस्था ही त्यासाठीच आवश्यक आहे.
 अनन्यसामान्य प्रेमाचे हे तत्त्व काही अर्वाचीन युरोपीय पंडितांना मान्य नाही असे दिसते. या प्रेमाची अपेक्षा असली म्हणजे पतिपत्नींची मने अन्य स्त्री-पुरुषांवर गेली तर त्यांना मत्सर किंवा असूया वाटू लागते. व अशी असूया वाटणे हे रानटीपणाचे द्योतक आहे असे काही लेखकांचे म्हणणे आहे. कारण या असूयेच्या बुडाशी मालमत्ता व स्वामित्व ही कल्पना असते असे ते म्हणतात. म्हणजे स्त्रीचे परपुरुषाकडे मन गेले तर पतीला जो मत्सर वाटतो तो स्त्री ही आपल्या मालकीची वस्तू आहे अशी कल्पना असल्यामुळे वाटतो असे त्याचे मत आहे.
 मेन अँड देअर मोटिव्हज् या पुस्तकात (पृ. ११७) फ्लूगेल या पंडिताने म्हटले आहे की स्वातंत्र्य, समता या कल्पनांशी मत्सर हा विसंगत आहे. आपले मन कोणावरही जडविण्याचा व्यक्तीला हक्क असला पाहिजे. सेक्स इन् सिव्हिलिझेशन या ग्रंथात (पृ. २३३) वुइल्यम लॉईड म्हणतो की असूया हे स्वार्थीपणाचे लक्षण आहे. स्त्री ही वस्तू आहे. पशुवत आहे या कल्पनेचे असूया समर्थन करते. हॅवलॉक एलिसने आपल्या सायकॉलजी ऑफ सेक्स या ग्रंथात हेच मत दोनतीन ठिकाणी प्रकट केले आहे. पण या पंडितांचे हे मत चूक आहे असे वाटते. मानोगॅमी म्हणजे एकपतिपत्नी ही विवाहाची पद्धत सर्वात उत्तम व नैसर्गिक आहे असे एलिसने स्वतःच मान्य केले आहे (सायकॉलजी ऑफ सेक्स, आवृत्ती १९३५ भाग ४ पृ ४१६, ४९४) असे असताना अनन्यसामान्य निष्ठा त्याने मान्य करू नये, हे विचित्र आहे. विवाहबाह्यसंबंध अपरिहार्य वेळी आणि दोष कबूल करून रसेलने मान्य केले आहेत. पण एलि-