पान:विज्ञान-प्रणीत समाजरचना.pdf/१४१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१३५)

सचे तसेही नाही. (पृ. ५१३) पण तो स्वैरसंभोगाला अनुकूल आहे असेही नाही. विवाहातील पावित्र्य त्याला हवेच आहे; पण या पंडितांचे मत काही असले तरी एकनिष्ठा, व शाश्वतता या विवाहातील मूल तत्त्वाशी असूयेचा निषेध विसंगत आहे एवढे खरे...या बाबतीत मॅक्डुगलने फार सुंदर विवेचन केले आहे. तो म्हणतो असूया वाटत नसेल तर प्रेमच असणे शक्य नाही. असूया ही अपरिहार्य आहे. एवढेच नव्हे तर ती योग्यच आहे. कॅरेक्टर ॲड कॉण्डक्ट पू. २३१, ३२) अनन्यसामान्य निष्ठा नसेल तर माणसाचे जीवन इस्पितळातल्या जीवनासारखे रसहीन, वैराण व शून्य होईल. आणि जगाच्या अनंत व्यापारांना अवश्य असणारा जो माणसाच्या मनाचा उत्साह तोच नाहीसा होईल. मॅरेज अँड मॉरल्स या पुस्तकात रसेलने हेच मत सांगितले आहे. (पृ. १०८) एडवर्ड कार्पेंटर याने असूयंचे दोन प्रकार सांगून नैसर्गिक असूया चांगली, कृत्रिम वाईट असे म्हटले आहे. वेस्टर मार्क म्हणतो की, सहचराचे मन दुसरीकडे गेले की व्यक्तीला वाईट वाटणे स्वाभाविक आहे. आणि आपल्या सहचरला (Partner) वाईट वाटू नये अशी प्रत्येकाने खबरदारी घेतली पाहिजे (फ्यूचर ऑफ मॅरेज पृ. ७८ लोवेन फील्ड असेच म्हणतो. हे वाचले म्हणजे या शास्त्रांना असूया शब्द फक्त नको आहे, ती कल्पना मान्य आहे असे दिसते. वरील विरोधी पंडितांचाही मनातील अर्थ कदाचित् असाच असेल.
 आतापर्यंतच्या विवेचनावरून पुढील गोष्टी स्पष्ट होतील असे वाटले. अनन्यसामान्य प्रेमाची मानवी मनाला भूक आहे. दोन जीव पूर्ण समरस झाल्यावाचून तो भागणं शक्य नाही. या समरसतेत मानसिक भागच जास्त असतो. म्हणून दोघांची सुख:दुखे रागद्वेष, वैचारिक उंची सारखी असल्यावाचून ही समरसता उत्पन्न होऊ शकत नाही. या मानसिक समरसतेला शारीरिक समागमाचीही फार आवश्यकता असते आणि म्हणून हे सर्व घडवून आणण्यासाठी एकनिष्ठ प्रेम व नात्याचा शाश्वतपणा जीत आहे अशी विवाहसंस्था अत्यंत आवश्यक आहे.
 विवाहसंस्थेच्या बुडाशी जे तत्त्व आहे तेच गृहसंस्थेच्या बुडाशी आहे. प्रजेचा विचार करताना ती सुप्रजा असावी एवढीच समाजाची अपेक्षा असते. पण व्यक्तीची दृष्टी याहून फार भिन्न आहे. पुत्र चांगले असावे हे कोणालाही