पान:विज्ञान-प्रणीत समाजरचना.pdf/१४२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१३६)

वाटणारच. पण समाजात पुष्कळसे चांगले पुत्र आहेत या विचाराने व्यक्तीला मुळीच समाधान होत नाही. मला पुत्र असावा, ही प्रबळ वासना गृहसंस्था निर्माण करते. सुप्रजेचा विचार येथे गौण आहे, येथेही पुन्हा गैरसमज होण्याचा संभव आहे. आपली कन्या किंवा पुत्र चांगले व्हावे म्हणून मनुष्य आटोकाट प्रयत्न करील हे खरे. पण त्या प्रयत्नांच्या बुडाशी समाजात चांगल्या नागरिकाची भर पडावी या हेतूला प्राधान्य नसून माझा पुत्र चांगला असावा याला प्राधान्य आहे आणि म्हणूनच तो गुणरूपांनी जरी कमी असला तरी त्याच्याच पालनपोषणाची मी काळजी घेतो. शेजाऱ्याचा मुलगा आपल्या मुलांपेक्षा जास्त बुद्धिमान आहे, आपल्या पुत्राच्या विद्येवर खर्च करण्यापेक्षा त्याच्यासाठी खर्च केल्यास समाजहित जास्त होईल असा विचारही मी कधी करीत नाही. येथेच समाजाच्या व माझ्या इच्छेचा विरोध येतो. समाजाची इच्छा अशो की पैसा खर्च व्हावयाचा तो चांगल्या विद्यार्थ्यावर व्हावा म्हणजे त्याचे चीज होईल. मला वाटते की मी मिळविलेला पैसा माझ्या मुलावर खर्च होऊन त्याची एक रेसभर जरी उंची वाढली तरी त्याचे चीज झाले. व्यक्तीच्या व समाजाच्या या परस्परविरोधी इच्छेचा समन्वय घडवून आणणे हे फार अवश्य आहे, पण तसे करताना 'माझा पुत्र' या विचाराला व्यक्तीला जे प्राधान्य द्यावेसे वाटते त्याला मुळीच धक्का लावून उपयोगी नाही. युरोपांतील काही अर्वाचीन पंडितांना हे मान्य नाही. समाजहिताकडे दुर्लक्ष करून व्यक्ती आपल्या मनाच्या सुखासाठी विरुद्ध आचरण करण्यास गृहसंस्थेमुळे प्रवृत्त होते, तिच्या सर्व भावना कुटुंबीय जनांवर केंद्रीभूत होऊन त्यातील विशालता नष्ट होते व त्यामुळे समाजाचे नुकसान होते असे त्यांचे मत असून त्यामुळे गृहसंस्था नष्ट करून टाकली पाहिजे असे ते म्हणतात. रशियातील कोलानटाई ही लेखिका या विचारासाठी प्रसिद्ध आहे. फ्लूगेलने आपल्या मेन अंड देअर मोटिव्हज् या पुस्तकात (पृ. ९६) म्हटले आहे की अनेक महत्त्वाच्या बाबतीत गृहसंस्था ही समाज हितबुद्धीच्या आड येते. पण मनाच्या विकासाला पायरी म्हणून फ्लूगेल गृहसंस्थेला मान देतो. हॅवलॅक एलिसनेही गृहसंस्थेमध्ये हा दोष आहे असे मान्य केले आहे. कॅलव्हर्टनही आपल्या बँकरप्टसी ऑफ मॅरेज या ग्रंथात म्हणतो की गृहसंस्था नसेल तर माणसांचे प्रेम जास्त व्यापक होऊन त्यांच्या सुखदुःखांची क्षेत्रे ही संकुचित न राहता