पान:विज्ञान-प्रणीत समाजरचना.pdf/१४४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१३८)

आपणास दिसून येतो. ए व बी या तुकड्यांच्या मुलांत तादृश फरक फारसा नसतो, पण आपण 'ए' पासून निराळे आहो, त्यांच्यावर चढ करण्यास आपण झटले पाहिजे, ही भिन्नतेची भावना विघातक तर नाहीच; पण उलट पोषक आहे. तुकडीच्या लहानशा गटांतील हीच भिन्नतेची भावना शाळा, शहर व राष्ट्र या पायऱ्यांनी वर गेलेली असते. इतरांहून भिन्नता जितकी तीव्र तितकी गटाशी निष्ठा उत्कट आणि त्या मानाने कर्तृत्त्व जास्त प्रभावशाली असे येथे अगदी स्पष्ट दिसून येते. अर्थात् या भिन्नतेत द्वेषाचा मागमूसही न येऊ देण्याची दक्षता घेणे फार अवश्य आहे पण काही असले तरी भिन्नतेखेरीज जीवन रुक्ष व कर्तृत्वशून्य होय यात शंकाच नाही. भिन्नतेची ही भावना गृहसंस्थेत अगदी उत्कटतेला नेलेली असते.
 विषयानंद, सुप्रजेची निर्मिती आणि अनन्यसामान्य प्रेमाची प्राप्ती या विवाहाच्या तीनही हेतूंचे येथवर आपण परीक्षण केले; आणि त्यातील तिसरा हेतु श्रेष्ठ ठरविला. विषयानंद व सुप्रजा यांना कमी महत्व आहे असे मुळीच नाही. अनन्यसामान्य प्रेमाला ते पोषकच आहेत. पण तिसरा हेतू श्रेष्ठ ठरविण्याचे कारण असे की त्यावाचून विवाहच असणे शक्य नाही. एखाद्या पतिपत्नींना अपत्य झाले नाही तरी त्यांचे वैवाहिक नाते संपत नाही तुरुंगात गेल्यामुळे किंवा अन्य काही कारणामुळे दहापंधरा वर्षे जरी त्यांना विषयसुख मिळाले नाही, तरी आपण त्यांना नावे ठेवीत नाही. त्यांनी विवाहबंधने मोडली असे आपण म्हणत नाही. पण ते जर परस्परांशी एकनिष्ठ नसतील तर त्यांच्या विवाहाला आपण विवाहच म्हणत नाही. तेव्हा विवाहात अनन्यसामान्य प्रेमाला श्रेष्ठता आहे हे निर्विवाद होय. यावरून असे दिसेल की व्यक्तीचे सुख हेच विवाहाचे अंतिम आहे. प्रजेच्या बाबतीत सुद्धा असेच आहे. व्यक्ती स्वतःच्या सुखासाठी प्रजा निर्माण करते व तिचे संगोपन करते. समाजाचे हित हे पर्यायाने व्यक्तीचेच हित असल्याने या सुखाला मुरडी व बंधने घालून सामाजिक दृष्टीही विवाहांत ठेवली पाहिजे हे खरे; पण हे सांगताना समाजाने मूळ हेतूकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, हेही तितकेच खरे आहे.
 स्त्री पुरुषांची उच्चतम मैत्री, अनन्यसामान्य प्रेम, ही भावना मुळांत जरी नैसर्गिक असली तरी तिची वाढ करून तिला योग्य वळण लावणे हे अवश्य आहेच. कारण परस्परविरोधी अनेक प्रकारच्या प्रवृत्ती मनुष्याच्या