पान:विज्ञान-प्रणीत समाजरचना.pdf/१४५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१३९)

अंगी असतात. कीर्तीची आस कोणाला नाही ? पण प्रत्येकाला ती असूनही आळस, हीन सुखाचा लोभ हे अनेक दुर्गुण तिच्या आड येतातच. तसेच अनन्यसामान्य प्रेमाचे आहे. कीर्तीची आस जरी नैसर्गिक असली तरी तिची शिकवण समाजाला देऊन तिचे सारखे संगोपन करणे हे जसे अवश्य आहे, तसेच स्त्री-पुरुषांच्या या उच्च मैत्रीचे आहे. सर्वांना यातील गोडी कळेलच असे नाही. कळली तरी त्याची किंमत देण्यास ते तयार होतीलच असे नाही. मनुष्य हा जसा अनेक चांगल्या प्रवृत्तीने युक्त आहे तसाच असत प्रवृत्तीनेही तो युक्त आहे त्यामुळे अनन्यसामान्य प्रेम हे जरी ध्येय असले तरी ते पूर्णांशाने कोठेही व कधीही साध्य होत नसते. बंधारा घालून नदीचे सर्वच्या सर्व पाणी आडवले तर हवेच आहे. पण तसे करू गेल्यास सर्वच पाणी वाहून जाऊन तलाव कोरडा पडण्याचा संभव असतो हा सृष्टिरचनेचा दोष आहे. मानवाच्या हातात नाहीत अशा शक्तीच इतक्या आहेत की त्यांचे ध्येय पूर्णांशाने त्याला कोठेच साध्य करून घेता येत नाही. इतकेच नव्हे तर आपला कमकुवतपणा, व सृष्टीच्या विरोधी शक्ती या ओळखून त्याने ध्येयाला योग्य त्या मुरडी घातल्या नाहीत, तर सर्वच बंधारा फुटून त्याची जमीन वैराण होण्याचा प्रसंग येतो. याच दृष्टीने एकनिष्ठा व शाश्वतपणा या विवाहाच्या अलौकिक तत्वांनाही अगदी नाइलाजाने व मोठ्या दुःखानेच का होईना पण मुरडी घालणे प्राप्त होते. त्या तशा घातल्या नाहीत म्हणूनच पश्चिमेकडील विवाहसंस्थेचे दिवाळे वाजले अशी लिंडसे, एलिस वगैरे थोर विचारवंताची तक्रार आहे. त्या मुरडी कोणच्या व कशा घालावयाच्या, त्या कितपत इष्टानिष्ट व शक्याशक्य आहेत याचा विचार पुढील प्रकरणी करावयाचा आहे. पण तत्पूर्वी विवाहसंस्था व गृहसंस्था यांच्याबद्दल नवविचारी पाश्चात्य पंडितांची काय मते आहेत ते पहावयाचे आहे.
 सामान्यतः पश्चिमेकडील सर्वच देशात विवाहसंस्था नष्ट होत आहे असे आपण ऐकत असलो तरी त्यातल्या त्यात रशियाबद्दल ओरड फार आहे. तेथे विवाहाची नोंद कायद्याने आवश्यक नाही. घटस्फोट वाटेल तेव्हा मिळतो, गर्भपात बेकायदेशीर नाही असे आपण ऐकतो आणि त्यामुळे तेथे सर्वत्र स्वैराचार, भ्रष्टाचार, बेबंदशाही आहे असे कल्पून त्यावर लेख लिहितो. सह्याद्रीच्या एप्रिलच्या अंकात असाच एक लेख आला आहे. पण मिस मेयोचे