पान:विज्ञान-प्रणीत समाजरचना.pdf/१४६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१४०)

उदाहरणे ध्यानात ठेवून वाचकांनी या बाबतीत फार सावध राहिले पाहिजे. त्या प्रश्नाची चांगली बाजूही पाहून सहानुभूतीने विचार करणे हेच युक्त होईल. 'फॅक्टरी, फॅमिली ॲंड वूमन इन् सोव्हिएट रशिया'- किंग्जबरी व फेअरचाइल्ड; 'मॅरेज अँड मॉरल्स् इन् सोव्हिएट युनियन- ॲना लुइस स्ट्रांग; 'प्रोटेक्शन ऑफ वुमेन अँड चिल्ड्रेन इन् सो. रशिया'- अलाइस विथ्रोफील्ड वगैरे पुस्तके पाहिली तर वस्तुस्थिती पुढीलप्रमाणे आहे असे दिसून येईल. स्वैराचाराला रशियात मुळीच उत्तेजन नसून आत्मनिग्रह, एकनिष्ठा हीच त्यांना प्रिय आहेत. मते मागविली तेव्हा शेकडा ७० तरुणांनी एकपत्नीपद्धत मान्य असल्याचे सांगितले. स्वैराचार करणाऱ्याला कम्युनिस्ट पार्टीतून हाकलून देतात. केवळ एकदा समागम केला इतके जरी सिद्ध झाले तरी पुरुषाला अपत्याच्या संगोपनाचा खर्च देणे कायद्याने भाग पडत असल्यामुळे स्वैराचार करणे येथे फार कठीण झाले आहे. गर्भपाताला कायद्याने परवानगी असली तरी त्याविरुद्ध सरकारने फार जोराची चळवळ चालविली आहे. बर्लिनपेक्षा मास्कोमध्ये जास्त गर्भपात तर होत नाहीतच, पण सरकारी डॉक्टरांच्या नजरेखाली शस्त्रक्रिया होत असल्यामुळे रशियातील स्त्रीच्या जीविताला धोका जवळजवळ नाहीसा झाला आहे. शिवाय पहिला गर्भ किंवा अडीच महिन्यांवर वाढलेला कोणाचाही गर्भ नाहीसा करणे बेकायदेशीर आहे. यावरून असे दिसेल को विज्ञानान्वये जे शुद्ध व निग्रही आचरण ठरेल ते रशियन लोकांना हवेच आहे. स्वैरता, अनिर्बंधता तेथे मुळीच नाही. फरक एकच आहे की या बाबतीत कायद्याचा काहीएक उपयोग नाही असे त्यांना वाटल्यामुळे ही गोष्ट उपदेशाने घडवून आणावी असा त्यांचा प्रयत्न आहे.
 मूठभर आर्यस्त्रियांच्या थोरवीकडे नजर ठेवून आर्यस्त्रियांच्या शीलाबद्दल भोळसटपणे काही तरी लिहिणाऱ्या लेखकांची खरोखर कींवच येते. काही थोड्या जाती सोडून दिल्या तर येथेही दोनतीन बाप, स्वैरसंभोग, मुदतीची लग्ने, बहुपतित्व ही वाटेल तितकी दृश्ये दिसतील. आणि पुन्हा या सर्वावर धर्माचा शिक्का लागलेलाही दिसेल. रशियात गर्भपाताला स्वातंत्र्य आहे असे सांगणे हे हिंदुस्थानात चौदा वर्षांच्या आतील मुलीवर अत्याचार करण्यास परवानगी आहे असे सांगण्याप्रमाणेच आहे. हिंदुस्थानात पंधरा