पान:विज्ञान-प्रणीत समाजरचना.pdf/१४७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१४१)

वर्षांखालच्या ६४ लक्ष; पाच वर्षाखालच्या दीड लक्ष आणि एक वर्षाच्या आतल्या १०८१ विधवा (!) आहेत. हे येथल्या विवाहपद्धतीच्या यशाचे चिन्ह खास म्हणता येणार नाही. शिवाय दहा व अकरा वर्षांच्या कित्येक माता (!) येथे मृत्युमुखी पडतात. हेही दृश्य मोठेसे शुभ नाही. श्रद्धानंद महिलाश्रम, पंढरपुरचे आश्रम वगैरे संस्था येथल्या विवाहसंस्थेबद्दल कोणची साक्ष देतात तीही ऐकली पाहिजे. त्यावरून असे दिसते की पश्चिमेकडे विवाहसंस्था धुळीस मिळत असली तर येथेही तेच आहे. इतकेच नव्हे तर येथल्या काही जाती सोडल्या तर हजारो वर्षे येथे रशियाच आहे. आणि त्या शुद्ध जातीचे जे प्रमाण आपल्याकडे निघेल, तितक्या स्त्रिया रशियातच काय पण कोणत्याही देशात सापडतील. मात्र अजून एक ठळक फरक आहे. हिंदुस्थानांतल्या स्त्रीला स्वातंत्र्याची प्राप्ती झाली नाही. ती झाली, तिला आपल्या व्यक्तित्त्वाची जाणीव झाली म्हणजे मग ती कशी राहील यावर सर्व अवलंबून आहे. येथे स्त्रियांना गोषात ठेवाव्या लागतात, किंवा गावाला जाताना त्यांना सुंकले घालावे लागते अशी कित्येक ठिकाणी स्थिती आहे. तेव्हा येथल्या विवाहसंस्थेची स्थिती काही फार अलौकिक आहे हे भोळसट समाधान मानून स्वस्थ बसणे अगदी घातकी ठरेल हे ध्यानात ठेवले पाहिजे.
 रशिया सोडून इतर देशांकडे पाहिले तरी असे दिसले की विवाहसंस्था किंवा गृहसंस्था अजिबात नाहीशी करावी असे म्हणणारे लेखक क्वचितच आढळतात. तिच्यामधले दोष दाखविणारा एलिससारखा पंडितही स्पष्टपणे असे सांगतो की गृहसंस्था बुडवायचा प्रयत्न करूनही बुडणार नाही. इतकी ती मानवाच्या स्वभावाशी निगडित झाली आहे. (मोअर एसेज ऑफ लव्ह अँड व्हर्च्यू पान २४ व्हिदर मनकाइंड पान २१४). जज् बेन लिंडसे यांच्यावर या बाबतीत फार गहजब झाला आहे. पण रिव्होल्ट ऑफ मॉडर्न यूथ या पुस्तकांत (पृ. १३७) त्याने स्पष्ट म्हटले आहे की विवाहसंस्थेवर माझा ठाम विश्वास आहे. आणि स्त्रीपुरुषांचे एकमेकांवर अनन्यसामान्य प्रेम (The love of one man for one woman) यालाच मी विवाह म्हणतो. रसेलचे मत वर सांगितलेच आहे. विवाहसंस्था मोडणे मुळीच हितप्रद नसून ती मोडली तर अपत्य संगोपन नीट होणार नाही आणि पुरुष कर्तृत्वशून्य होईल असे तो म्हणतो. दि वे ऑफ ऑल वूमेन (पू. १७२) या