पान:विज्ञान-प्रणीत समाजरचना.pdf/१४८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१४२)

पुस्तकात ईस्थरहार्डिंग या लेखिकेने म्हटले आहे की शाश्वतता हे तर विवाहाचे मुख्य लक्षण होय. आणि तसे न मानता जी स्त्री विवाह करील तिचा विवाह कधीच सुखादायी होणार नाही. व्हॅन डी व्हेल्डे या स्विट्झरलंडमधील मोठ्या लेखकाचे मत असेच आहे तो म्हणतो की एकनिष्ठा व शाश्वतता या लक्षणांनी विवाहसंस्थेचा विकासच दिसून येतो आणि विवाहातून काही त्रास व दुःखे जरी निर्माण होत असली तरी त्या संस्थेच्या अभावी याच्यापेक्षा किती तरी अधिक दुःखे मानवाला भोगावी लागतील. (आयडियल मॅरेज पृ. २) मॅक् डुगल या विख्यात मानवशास्त्रज्ञाला विवाह तर मान्य आहेच, पण शिवाय विवाहित स्त्रीपुरुषांनी परक्या स्त्रीपुरुषांसह नाचणे हेही गर्ह्य आहे असे तो मानतो (कॅरेक्टर ॲंड काँडक्ट.)
 यावरून असे दिसेल की युरोपातल्या पंडितांनाही विवाह आणि गृह या दोन्ही संस्था अत्यंत आवयश्क वाटतात. फरक एवढाच आहे की तिच्या मर्यादा व नीतिनियम विज्ञानाला विचारून बसवावे असे ते म्हणतात. मानसशास्त्र, सुप्रजाशास्त्र, आरोग्यशास्त्र, अर्थशास्त्र इत्यादी अनेक शास्त्रांना विचारून नियम ठरवावे व त्यांना संमत नाहीत अशी बंधने कितीही पवित्र, व श्रुतिस्मृतिपुराणबायबलोक्त असली तरी ती काढून टाकावी असे त्यांचे म्हणणे आहे. तपशिलात मतभेद होणे केव्हाही शक्य आहे. काही मतभेदाने सिद्धान्तच उलटतो हेही खरे आहे. पण असे कोठेही असणारच. आपल्याकडच्या दोन स्मृती घेतल्या तरी त्यताही असे दिसून येईल. तेवढ्यावरून काही विपरीत बोलण्यात मुळीच अर्थ नाही. आता विज्ञानाचे सांगणे आणि धर्माचे सांगणे यातच जमीनअस्मान अंतर आहे यात शंका नाही. पण ते एवढ्याच बाबतीत नसून सर्वच क्षेत्रात आहे. आणि अशा वेळी विज्ञानाचे ऐकले पाहिजे हे आपण मागेच ठरविले आहे.
 पण गृहसंस्थेच्या पुरस्कर्त्यांनी पश्चिमेकडील या हल्ल्याने गांगरून जाण्याचे मुळीच कारण नाही. येथील वेदान्त्यांनी याहीपेक्षा जास्त मोठा हल्ला मागे या संस्थेवर केला होता आणि अजून तीच बडबड करण्याची चाल तत्पंथीयांनी सोडलेली नाही. कसली बायको नि कसला पुत्र असे म्हणून आचार्यांनी पुरुषाची दोन प्रबळ निष्ठास्थांनेच हलविली. संसाराची काळजी वाहणे हे या मार्गातील लोकांना मोठे गर्ह्य वाटते, एखादेनि अकाळ काळें ।