पान:विज्ञान-प्रणीत समाजरचना.pdf/१५०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१४४)

 गृहसंस्थेची पुनर्घटना करण्यास भाग पाडणारी मुख्य गोष्ट म्हणजे स्त्रियांच्या मनात स्वातंत्र्यप्रीतीचा झालेला उदय ही होय. आजपर्यंत जगात स्त्रीला व्यक्ती म्हणून कोणीच ओळखीत नव्हते. मनुष्य जात ही फक्त पुरुषांची आणि ती कायम टिकावी, तिला सुख व्हावे, तिला मोक्ष मिळण्याची सोय व्हावी या हेतूने वापरण्यात येणारे स्त्री हे एक साधन होते. मोक्ष हे अंतिम ध्येय पण ते पुरुषांचे. स्त्री ही त्याच्या आड येणारी वस्तू म्हणून ती टाकून द्यावी. 'स्त्रक्, चंदन, वनितादि भोग' या शब्दरचनेत ही मनोवृत्ती स्पष्ट दिसून येते. स्त्रीला बंधनात ठेवता यावे यासाठी 'ज्ञानानेच मोक्ष मिळतो' हा वज्रलेप सिद्धान्तही बदलून तिला पतिसेवेने मोक्ष मिळेल अशी खात्री देण्यातही शास्त्रज्ञांनी मागे पुढे पाहिले नाही. पहिली बायको मेली तर अग्निहोत्र अडेल म्हणून दुसरी करण्यास हरकत नाही. म्हणजे पुरुषाच्या पुण्यप्राप्तीच्या सोयीसाठी स्त्री आहे. दुसरा नवरा करून स्त्रीला अग्निहोत्र घेण्यास मुळीच परवानगी नव्हती. उत्तरवयातही पुरुषाला विवाह करण्यास परवानगी देऊन त्या स्त्रीला पुनर्विवाहाची बंदी करणे या नियमात तर माणुसकीलाही फाटा दिलेला दिसतो. पुरुषाची शेवटची दहा पाच वर्षे सुखाची जावी यासाठी स्त्रीच्या सर्व जीविताचा नाश करून टाकणारे शास्त्रकार स्त्रीकडे कोणच्या दृष्टीने पहात होते ते सांगण्याची जरूर नाही. दुसऱ्याच्या जीविताचे साधन म्हणून जगणे या अत्यंत हीन कल्पनेची स्त्रीला आता चीड आली आहे व आपले जीवन हेही स्वतंत्रपणे ध्येय असू शकते, आपल्यालाही स्वतंत्र व्यक्तित्व आहे हे जगाला निर्भयपणे सांगून त्यासाठी वाटेल ती दुःखे व हालअपेष्टा सोसण्यास ती तयार झाली आहे.
 स्त्री-स्वातंत्र्य, स्त्री-पुरुषांची समता हे वाद उपस्थित झाले तेव्हा प्रथम त्यावर अनेक बाष्कळ, गंभीर, प्रामाणिक, कुत्सित अशा टीका होऊ लागल्या. देह, मन, बुद्धि या सर्व बाबतीत स्त्रीपुरुषांची सामर्थ्ये सारखी आहेत असेच नव्या पक्षाचे म्हणणे आहे, असे कल्पिले जाऊन त्यावर लोक टीका करू लागले पण इतके एकांतिक विधान कोणतीही विचारी स्त्री किंवा पुरुष करणार नाही, हे उघड आहे. साम्यवादाचे महाभोक्ते जे रशियन तेही असे म्हणत नाहीत. स्त्रीला वाटेल त्या क्षेत्रांत काम करण्यास तेथे मोकळीक आहे हे खरे पण वाटेल ते याचा अर्थ विज्ञान सांगेल ते असा आहे. केवळ