पान:विज्ञान-प्रणीत समाजरचना.pdf/१५१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१४५)

रूढीला ते अमान्य म्हणून स्त्रीला तेथे बंदी असे नाही. शास्त्रीय युगाचा खरा अर्थ त्यांना समजल्यामुळे डोळे मिटून ज्ञान सांगणारा ऋषी किंवा लांब झगा घालणारा पाद्री या दोघांनाही त्यांनी गुरुपदावरून हाकलून देऊन तेथे विज्ञानाची स्थापना केली आहे. प्रथम नृत्यगायनापासून लष्करापर्यंत सर्व क्षेत्रे त्यांनी स्त्रियांना खुली करून दिली आणि प्रत्येक ठिकाणी वैद्यकीय तपासणी करून दहा दहा वर्षांचे अनुभव जमेस धरून त्यावरून नियम बसविले. गर्भावर, अपत्यावर किंवा स्वतः स्त्रियांच्या आरोग्यावर ज्याने वाईट परिणाम होतो असे दिसेल ते काम- स्त्रीला कायद्याने बंद करण्यात येते. काही किलो मिटरच्यावर वजन उचलणे स्त्रीला सांगावयाचे नाही, स्फोटकद्रव्याच्या कारखान्यात ड्रिलिंग, लोडिंग वगैरे कामे ही त्यांनी करावयाची नाहीत, इत्यादि नियम आहेत. पण गवंडीकाम, मोटार चालविणे, इंजने चालविणे येथपासून वकील, न्यायाधीश किंवा मंत्री होणे ही कामे त्यांना खुली आहेत. यावरून असे दिसेल की स्त्री-पुरुषांची समता ही आंधळया किंवा हेकट दुराग्रही दृष्टीने मुळीच चालविलेली नाही. स्त्रियांना पगारही त्यांच्या कामाप्रमाणेच मिळतो. बरोबरी आहे म्हणून काम कमी असले तरी पगार तितकाच द्यावा असे नाही. तेव्हा असे स्पष्ट दिसते की शरीर, मन, बुद्धी यांच्या सामर्थ्याच्या दृष्टीने विज्ञानाने सांगितलेला प्रत्येक फरक नव्या लोकांना मान्य आहे व त्यान्वये त्यांनी समाजरचनेत भिन्न व्यवस्थाही केली आहे. पण असा फरक असला तरी, म्हणजे स्त्री-पुरुषांच्या कामांच्या क्षेत्रात फरक असला तरी स्त्री-पुरुषांच्या योग्यतेत फरक करावा हे त्यांना मान्य नाही आणि त्यामुळेच स्त्रीचे पारतंत्र्यही त्यांना मान्य नाही.
 स्त्रीच्या स्वातंत्र्याच्या बाबतीत एक अगदी घोटाळ्याचा प्रश्न नेहमी उपस्थित केला जातो. स्त्री शिकली आणि बुद्धीने पुरुषाच्या बरोबरीची झाली तरी ती पुरुषापेक्षा केव्हाही दुर्बलच रहाणार; आणि हे जोपर्यंत आहे तोपर्यंत तरी तिला स्वातंत्र्य देता येणे शक्य नाही असे काही लोक म्हणतात. येथे पारतंत्र्य आणि रक्षण या दोन शब्दांचा घोटाळा होत आहे. काही झाले तरी स्त्री दुबळी रहाणार हे खरे असल्यामुळे तिला रक्षण हवे हे खरे आहे. पण रक्षण हवे याचा अर्थ पारतंत्र्य आवश्यक आहे असा मुळीच नाही. समाजात फक्त स्त्रियाच दुबळ्या आहेत असे नाही. गेली शे-दोनशे