पान:विज्ञान-प्रणीत समाजरचना.pdf/१५२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१४६)

वर्षे सर्व जगभर भांडवलवाले लोक मजुरांना पिळून काढीत आहेत. इंग्लंडमधील कारखान्यात मजुरांचा अमानुष छळ होत असे. तेव्हा तो थांबविण्यासाठी सरकारने कायदे करून मजुरांचे रक्षण केले. पण मजुरांना रक्षणाची जरूरी आहे म्हणून त्यांना पारतंत्र्यही अवश्य आहे असे केव्हाही कोणीही म्हणाले नाही. तेच स्त्रीच्या बाबतीत युक्त आहे. स्त्रियांना लोक पळवून नेतात म्हणून त्यासाठी कडक कायदे करणे, किंवा एकटेदुकटे न हिंडण्याचा त्यांना उपदेश करणे हे योग्य ठरेल. आणि तसे कायदे किंवा तसा उपदेश हा इंग्लंड व अमेरिका या देशांतही चालू आहे. पण तिला रक्षण जरूर आहे म्हणून ती मताधिकाराला लायक नाही, किंवा तिने द्रव्यार्जन करणे युक्त नाही असे मुळीच ठरत नाही. स्वातंत्र्य हवे याचा अर्थ, जेथे मला धोका आहे तेथेही मला जाण्यास परवानगी असावी, असा स्त्रीही कधी आग्रह करीत नाही. पण एवढे मात्र खरे की, समाजाच्या उन्नतीची सर्व काळजी आपल्यालाच आहे, स्त्री अगदी थिल्लर व उथळ आहे. तेव्हा तिला धोका कशापासून आहे हेही आम्ही ठरविणार हा जो पुरुषांचा आग्रह तो स्त्रीने मान्य करणे शक्य नाही. तो मान्य करणे म्हणजेच पारतंत्र्य. मनुस्मृतीत स्त्रियांना पारतंत्र्य सांगितले आहे तेथे त्या शरीराने दुर्बल आहेत, म्हणून सांगितलेले नसून त्या अधम आहेत रूप, वय न पाहता वाटेल त्या पुरुषाशी संगत होतात, कितीही काळजी घेतली तरी व्यभिचार करतात म्हणून त्यांना पारतंत्र्य असावे असे सांगितले आहे. (मनु. ९,१४, १५) केवळ शरीराचे दीर्बल्यच अभिप्रेत असते तर त्यांना वेदमंत्रांचा अधिकार नाही, ब्रह्मचर्चाचा अधिकार नाही असले निर्बंध शास्त्रकारांनी घातले नसते. असो. तर मुख्य प्रश्न स्त्रीला आपण व्यक्ती समजतो का वस्तू समजतो यावर अवलंबून आहे. जुने शास्त्रकार तिच्याकडे वस्तू म्हणून पहात असत पण मनु वगैरे शास्त्रकारांचे स्त्रियांच्या शीलाबद्दलचे वर सांगितलेले मत सर्वस्वी चूक आहे. त्याही एकनिष्ठा, गांभीर्य, कडक मनोनिग्रह, अविरत उद्योग इत्यादि पुरुषी मक्त्याचे गुण वाटेल त्या तीव्रतेने दाखवू शकतात, असा इतिहास निर्वाळा देत असल्यामुळे स्त्रीला रक्षणाची जरूर असली तरी त्यामुळे तिचे स्वातंत्र्य हिराविले पाहिजे हे म्हणणे अगदी अयुक्त आहे. नीच लोक स्त्रिया पळवतात, ते स्त्रियाना वेदमंत्रांचा अधिकार दिला किंवा शिक्षण दिले किंवा