पान:विज्ञान-प्रणीत समाजरचना.pdf/१५३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१४७)

मताधिकार दिला तर जास्त प्रमाणावर पळवू लागतील असे मुळीच नाही. उलट स्त्री शिकलेली असली तर पुरुषाप्रमाणेच तिचा जगाचा अनुभव आणि विचारशीलता ही वाढणार असल्यामुळे वाईट लोकांच्या भूलथापा तिला चांगल्या उमगून तिचे रक्षणच जास्त होण्याचा संभव आहे. तेव्हा रक्षण आणि पारतंत्र्य यांचा एकच अर्थ कल्पून स्त्रीचे स्वातंत्र्य हिरावण्यात काहोच अर्थ नाही. स्त्री-पुरुषांच्या भिन्न कार्यक्षेत्रातही हेच म्हणता येईल. ड्रिलिंग किंवा लोडिंग आले नाही, दोन मण वजन उचलता आले नाही म्हणून त्यावरून, आपण विवाह करावा की नाही, पति कोणचा निवडावा, अपत्यसुख भोगावे की नाही, याही बाबतीत आपल्याला स्वातंत्र्य असू नये असला विचित्र न्याय मान्य करण्यास स्त्री तयार नाही. कमालीचे शरीरकष्ट करणारा शूर शिपाई आणि सुखासनावर बसून संशोधन करणारा शास्त्रज्ञ यांची कार्यक्षेत्रे भिन्न असली तरी त्यांच्या योग्यतेत जसा फरक नाही तसाच स्त्री-पुरुषांच्या बाबतीत, त्यांची कार्यक्षेत्रे भिन्न असली तरी फरक नसावा अशी नव्या स्त्रीची मागणी आहे. आणि ती सर्वथा न्याय्य असल्यामुळे ती जमेला धरूनच यापुढची गृहव्यवस्था केली पाहिजे. आणि त्याच दृष्टीने बालविवाह, पुनर्विवाह, प्रेमविवाह, घटस्फोट इत्यादि प्रश्नांचाही विचार केला पाहिजे.
 स्त्रीच्या विवाहाचे वय हा प्रश्न अनेक दृष्टीने महत्त्वाचा आहे. स्त्रीपुरुषांची उच्च सुसंस्कृत मैत्री हे जरी विवाहाचे अंतिम ध्येय असले तरी आपत्यांची निर्मिती आणि संगोपन हा काही कमी महत्त्वाचा प्रश्न नाही. समाजाच्या दृष्टीने तर त्यालाच जास्त महत्त्व आहे. तेव्हा स्त्रीच्या मनाचा विकास, पतिपत्नीमधील सलोखा व अपत्यांची सुदृढता या तिहेरी दृष्टीने स्त्रीच्या विवाहसमयीच्या वयाचा विचार केला पाहिजे.
 या सर्वदृष्टीने पाहता विवाहसमयी स्त्रीचे वय २० ते २२ व पुरुषाचे २५ ते २७ असावे असे अर्वाचीन शास्त्रज्ञाचे मत आहे. 'दी सेक्शुअल लाइफ ऑफ वूमन' या ग्रंथांत हेनरीक् कीश या पंडिताने प्रश्नाचा फार बारकाईने विचार केला आहे. तो म्हणतो की ऋतुप्राप्ती हे अपत्यक्षमतेचे मुळीच चिन्ह नाही. सुप्रजा निर्माण होईल अशी स्त्रीच्या शरीराची वाढ वीस वर्षांच्या आत होत नाही (पृ. २७, १६६). १५ ते ४५ हा स्त्रीच्या अपत्यनिर्मितीचा काळ