पान:विज्ञान-प्रणीत समाजरचना.pdf/१५४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१४८)

आहे. आणि समागम जितका लवकर होईल तितका हा काळ लवकर संपुष्टात येत असल्यामुळे विवाह लवकर होणे हितप्रद नाही. लवकर विवाहित होणाऱ्या स्त्रीची प्रजनन शक्ती कमी होते. पृ. १६८) आणि २० वयाच्या आत निर्माण होणाऱ्या अपत्यांत मृत्यूचे प्रमाणही जास्त असते (पृ. २३५) असे तो म्हणतो. हिंदुस्थानच्या १९३१ च्या सेन्सस रिपोर्टातही असेच सांगितले आहे. त्यांच्या मते लग्न लवकर झाले तर मुले जास्त होतात पण त्यातली मरतात जास्त. उशीरा लग्न केले तर मुले जगण्याचे प्रमाण जास्त पडते. (पृ. २०६) 'काँज्युगल हॅपिनेस' या पुस्तकात डॉ. लोवेनफील्ड यांनीही हेच मत दिले आहे. तो म्हणतो की वीसच्या आधी विवाहित झाल्याने जास्त स्त्रिया मृत्युमुखी पडतात. १४ ते १८ या वर्षात सर्वसाधारणच स्त्रियांच्या मृत्यूचे प्रमाण जास्त असते. पण विवाहित स्त्रिया दरहजारी १४ व अविवाहित ८ च मरतात. २० ते २५ या वयात विवाहित व अविवाहित यांच्या मृत्युसंख्या जवळ जवळ सारख्या आहेत. म्हणून वीस वर्षांच्या आत विवाह करू नये (पृ. २९). Sellheim या जर्मन शास्त्रज्ञाचेही मत आपल्यासारखेच असल्याचे लोवेनफील्डने सांगितले आहे (पृ. ३२) व्हॅन डी व्हेल्डे या स्वीडिश शास्त्रज्ञाने फर्टिलिटी अँड स्टरिलिटी इन् मॅरेज या पुस्तकात हेच मत प्रकट केले आहे (पृ . १७५). स्त्रीचे आरोग्य व अपत्याची सुदृढता याखेरीज आणखीही एक मुद्दा या शास्त्रज्ञांनी सांगितला आहे. वीस वर्षाच्या आधी अपत्यासाठी स्त्रीच्या शरीराची जशी वाढ झालेली नसते तशीच मनाचीही झालेली नसते. मातृपदासाठी अवश्य असणारा मनाचा जो विकास व्हावा लागतो तो या वयात मुळीच झालेला नसतो. पंधराव्या सोळाव्या वर्षी मुलीच्या अंगचा हूडपणाही पुरता गेलेला नसतो. आणि तो जाणे इष्टही नसते. (पृ. १६६) हा मुद्दा फारच महत्त्वाचा आहे. १५ ते २० ही चार पांच वर्षे व्यक्तीच्या आयुष्यात फार रम्य अशी असतात. तारुण्याच्या बेफाट वृत्ती येथे जागृत होत असतात. नाना प्रकारची ध्येये मनापुढे तरंगत असतात. आणि पूर्ण उच्छृंखलपणे व अनिर्बंधपणे जीविताकडे पाहाणे याच वयात शक्य असते. या वयात तारुण्याचा खरा मानसिक आनंद व्यक्तीला मिळावयाचा असतो आणि कोणाच्याही प्रकारची शाश्वत स्वरूपाची जबाबदारी यावेळी खांद्यावर आली तर व्यक्ती या अलौकिक सुखाला मुकते. हा केवळ सुखाचाच प्रश्न