पान:विज्ञान-प्रणीत समाजरचना.pdf/१५५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१४९)

नाही. अनिर्बंध उच्छृंखलपणा, बेफामपणा हा मनाच्या वाढीला तर आवश्य आहेच, पण शरीरावरही याचे सुपरिणाम होतात. म्हणून या वयात व्यक्तीवर शाश्वत स्वरूपाची कसलीच जबाबदारी नसणे हे फार अवश्य आहे. तारुण्याची ही सुखे, अनिर्बंधतेचा हा आनंद आर्यस्त्रीला आज हजारो वर्षांत कधीच मिळालेला नाही. तो यांपुढे तिला मिळणे न्याय्य व इष्ट आहे. म्हणून या वयात तिच्यावर मातृपद लादणे हे अयुक्त आहे. कीश् लोवेन फील्ड, व्हेल्डे वगैरे शास्त्रज्ञांची मते वर सांगितली. सुप्रसिद्ध पंडित हॅवलॉक एलिस याचेही असेच मत आहे. सॉयकॉलजी ऑफ सेक्स (खंड ४ था आवृत्ति १९३५) या ग्रंथांत जर्मन न्यूरॉलजिस्ट बेयर याचे प्रथम मत देऊन (पृ. ४७८) नंतर आपलेही मत स्त्रीचे वय वीसच्यावर असावे असेच आहे (पृ. ६३४), असे याने म्हटले आहे. पण एलिसच्या ग्रंथांत एक भानगड आहे. वैद्यक- शास्त्रज्ञांचा पुरावा म्हणून त्याने जो दिला आहे तो वीसच्या आतील विवाहाला अनुकूल आहे सोळाव्या वर्षीच्या आतील स्त्रियांची प्रसूति सुखाची होते, त्याची अपत्ये चांगली होतात, असाच शास्त्रीय पुरावा त्याने दिला आहे. पण असे असूनही आपले मत म्हणून देताना त्याने वीसनंतरच स्त्रीला अपत्य व्हावे असे दिले आहे. हे पाहून आपले स्वयंमन्य समाजशास्त्रज्ञ जोशीबुवा त्यांच्यावर फारच संतापले आहेत. एलिसची विद्वत्ता बाहेर काढून ते म्हणतात (हिंदूचे समाज रचनाशास्त्र. पू. ३५७) शास्त्रीय ज्ञानांशी विरोधी वर्तन करण्याचा कोणाही स्त्रीला किंवा पुरुषाला हक्क नाही. सोळाव्या वर्षाच्या आत प्रजा झाली पाहिजे असे शास्त्राने सांगितले की ती झालीच पाहिजे. बुबांची ही शास्त्रावरची श्रद्धा पाहून कोणीही स्त्री किंवा पुरुष त्यांचे कौतुकच करील. कारण साऱ्या पुस्तकात इतकी शास्त्रनिष्ठा त्यांनी कोठेच दाखविलेली नाही. पण वैद्यकीय पुरावा थोडा विरूद्ध असूनही एलिसनने विसाव्या वर्षामधी स्त्रीने लग्न करू नये असे म्हटले आहे त्याचे कारण उघड आहे. मानवी समाजाबद्दल बोलतांना कोणत्याही एकाच शास्त्राचा विचार करून कधी भागत नाही. सेक्स इन सिव्हिलिझेशन या ग्रंथात एका लेखकाने या प्रश्नाचे फार सुरेख विवेचन केले आहे. तो म्हणतो, मानवी शास्त्रांचा फार मोठा दोष म्हणजे असा की एखाद्या प्रश्नाचा विचार करताना एकाच अंगावर जोर देऊन इतर बाजूंचा ती विचार करीत नाहीत. मानसशास्त्र व्यक्तित्वावर सर्व