पान:विज्ञान-प्रणीत समाजरचना.pdf/१५६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१५०)

भर देऊन परिस्थितीचा विचारही करीत नाही. अर्थशास्त्र व समाजशास्त्र परिस्थितीवर सर्व भर देऊन मानवाच्या अंतःशक्तींना गौण मानतात. तर्कशास्त्र हे जीवनशक्तीचा विचार करीत नाही आणि जीवनशास्त्र व सुप्रजाशास्त्र ही अगदी हास्यास्पद एकांतिकपणा करतात. ही एकांतिक विचारसरणी हा मानवी शास्त्रामध्ये असलेला फार दोष मोठा आहे (पृ. २४८). जोशीबुवांना हे ज्ञान नाही असे नाही. पण ज्ञानी असून अज्ञानी हीच तर बुबांची मुख्य खुबी आहे. व्यक्तीला जीवित ही मौल्यवान वस्तू वाटली पाहिजे, तिचा वीट येऊन उपयोग नाही. नाहीतर समाजस्वास्थ्य बिघडेल असे शास्त्र त्यांनीच सांगितलं आहे. (पृ. २८२) . तरी पण अध्यात्मिक दृष्ट्या वीट आलाच पाहिजे असेही ते म्हणतात. यावरून शास्त्रांनी काही सांगितले तरी दुसऱ्या काही सोयीसाठी ते अमान्य करणेबुवांना पसंत आहे हे उघडच आहे. असो. मातेचे व मुलाचे आरोग्य, स्त्रीची मानसिक वाढ, इत्यादि सर्व दृष्टींना २०/२१ हेच वय स्त्रीच्या विवाहाला कसे योग्य आहे हे आपण पाहिले. सुप्रसिद्ध पंडित सर फ्रॅन्सिस गाल्टन याचेही मत असेच आहे. लवकर विवाह व्हावा असे त्याचे मत असे. ते कोणी बालविवाहाकडे खेचू नये म्हणून त्याचा शिष्य कार्ल पियर्सन याने खुलासा केला की सुदृढ व सुसंस्कृत स्त्रियांनी २८, २९ या वयापर्यंत विवाह न लांबविता २१, २२ या वयातच विवाह करावा असे गाल्टनचे मत होते (लाईफ अँड लेटर्स ऑफ फ्रान्सिस गाल्टन खंड ३ पृ. २३३).
 आणखी एका महत्त्वाच्या मुद्याचा विचार करावयास हवा. सेक्स इन सिव्हिलिझेशन या ग्रंथात डॉ. हॅमिल्टन यांनी कित्येक विवाहित स्त्रियांना समागमापासून उत्कट रतिसुख मिळत नाही, असे का व्हावे या प्रश्नाचा विचार केला आहे. एकंदर नऊ कारणांचा विचार करून त्यांनी शेवटी असा निकाल दिला की ज्या स्त्रियांच्या मनावर लहानपणी विषयसुख हे निंद्य, नीच प्रकारचे आहे, सभ्य माणसांनी स्त्री-पुरुषांच्या भिन्न देहाचा विचार करणे पाप आहे इत्यादि संस्कार झालेले असतील त्या स्त्रिया वैवाहिक आयुष्यात रतिसुखाला मुकतात. नकळत झालेले हे मनोगंड त्यांच्या सुखाच्या आड येतात. हा विचार करून निबंध संपविताना त्यानी स्त्रीच्या वयाचा विचार केला आहे. तेथे ते म्हणतात की प्रथम समागमाच्या वेळी स्त्रीचे वय