पान:विज्ञान-प्रणीत समाजरचना.pdf/१५८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१५२)

यांनी सांगितला आहे (पृ. ५७६). ते म्हणतात- ऋतुप्राप्तीच्या आधी चारपाच वर्षे कामसुखाच्या कल्पनाही मुलीच्या मनात न येणे हे तिच्या वैवाहिक आयुष्यांतील उत्कट रतिसुखाच्या दृष्टीने फार हितावह आहे. या वयात या विषयाची जाणीवही ज्यांना नसते, किंवा यापासून ज्यांना अलिप्त ठेवण्यात येते त्यांना विवाहानंतर रतिसुख जास्त मिळते. ज्या या विषयांचा विचार करतात त्यांना ते मिळत नाही. यावरून या काळात मुलीचा विवाह न करणे तिच्या पुढील रतिसुखाच्या दृष्टीने किती हितावह आहे ते सहज ध्यानात येईल. म्हणजे विवाह पंधरा वर्षांनंतर व्हावा एवढे तरी यावरून निर्विवाद सिद्ध होईल.
 लोकसंख्येचा प्रश्न उपस्थित करून प्रौढविवाह व स्त्रीशिक्षण यावर एक मोठाच आक्षेप घेण्यात येत असतो. जी स्त्री शिकत नाही ती पंधराव्या वर्षी प्रजोत्पादनास सुरुवात करते व जी शिकते ती २३ व्या वर्षी करते. म्हणजे स्त्रीशिक्षण नाही तेथे १५ वर्षांनी पिढी बदलणार व आहे तेथे २३ वर्षांनी बदलणार. याचा अर्थ असा की एका शंभर वर्षांच्या अवधीत सुधारलेल्या व न सुधारलेल्या समाजात प्रजेचे प्रमाण २०:८० असे होणार. आणि म्हणून स्त्रीशिक्षण व त्यामुळे येणारा प्रौढ विवाह हा घातक आहे असा हा पक्ष आहे.
 पण हे विवेचन अगदी चुकीचे आहे. एक तर लवकर झालेली संतती जास्त मृत्युमुखी पडते व मातांचे आरोग्यही त्याने बिघडते असे बऱ्याच डॉक्टरांचे मत असल्याचे वर सांगितलेच आहे. दुसरे असे की, हे जे दोन गट आहेत ते एकाच समाजात असले, म्हणजे यांच्यात मारामारी नसली तर समाजातल्या अमुक एका गटात प्रजा कमी होते याला भिण्याचे काहीच कारण नाही. सांस्कृतिक दृष्ट्या जो जो वर जावे तो तो प्रजोत्पादन शक्ती कमी होते असे एक मत आहेच. पण तेवढ्यासाठी संस्कृतीहीन राहणे हे जसे आपण पत्करीत नाही, तसेच येथे केले पाहिजे. बरे, या दोन गटात मारामारी आहे असे धरले तर काय होईल याचा विचार आपण लोकसंख्येची वाढ व नियमन या प्रकरणात केलाच आहे. युद्धांतले यश हे संख्येवर मुळीच अवलंबून नसून कर्तृत्वावर असते. ब्राह्मण, क्षत्रिय वगैरे मूठभर लोकांनी चार हजार वर्षे हिंदुस्थानवर राज्य केले ते संख्येच्या बळावर नसून अकलेच्या बळावर केलेले आहे. तेव्हा अकलेच्या प्राप्तीसाठी संख्या घटली तरी फारशी हरकत नाही.