पान:विज्ञान-प्रणीत समाजरचना.pdf/१५९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१५३)

शिवाय हॅवलोक एलिसचा, मागे एकदा सांगितलेला महत्त्वाचा उपदेशही विसरणे युक्त नाही. समाजातील शांतता व स्थिरता टिकून राहण्याच्या दृष्टीने पिढी लवकर पालटणे हे अगदी अनिष्ट आहे असे तो म्हणतो. (टास्क ऑफ सोशल हायजीन पृ. १५१) या दृष्टीनेही बालविवाह अनिष्ट आहे.
 माझ्यामते बालविवाह हा स्त्रीच्या व्यक्तित्वाच्या विकासाच्या आड येतो, एवढाच मुद्दा त्याच्या निषेधास पुरेसा आहे. अपत्याचे संगोपन, गृहव्यवस्था, या दृष्टीने स्त्रीशिक्षण अवश्य आहेच. स्त्री-पुरुषसंबंधविषयक शिक्षण तिच्या रतिसुखाच्या व इतरही अनेक दृष्टीने तिला मिळणे हेही अवश्य आहे. आणि तिच्या मनाच्या वाढीच्या दृष्टीने वाङ्मयीन शिक्षणाचीही आवश्यकता आहे. असे असताना भावी पिढीच्या दृष्टीने तिला या सुखाला मुकविणे म्हणजे तिच्या स्वतःच्या जीविताचा विचार न करण्यासारखे आहे. भावी पिढीची जबाबदारी प्रत्येक स्त्रीपुरुषावर आहे यात शंकाच नाही. पण तेवढ्यासाठी उच्च संस्कृतीचा आनंद सर्वस्वी नष्ट होत असेल तर ती काळजी करणे म्हणजे मूर्खपणाचे आहे. कारण समाज संस्कृतीच्या वरच्या पायरीला जाणे, हे तर समाजाचे ध्येय आहे. आणि समाजात स्त्रिया येतातच. तेव्हा प्रथम त्यांच्या मनोविकासाची काळजी घेणे हे अवश्यच आहे. पण सुदैवाने भावी पिढी आणि स्त्रीशिक्षण यात विरोध येतच नाही. उलट भावीपिढीच्या दृष्टीनेही स्त्रीशिक्षण व प्रौढविवाह अवश्य आहे. तेव्हा प्रजेचा हा मुद्दा अगदीच फोल आहे.
 स्त्रीच्या विवाहाच्या वयाचा येथवर विचार केला. पुरुषाच्या विवाहाचे वय २५ असावे असे शास्त्रज्ञांचे मत वर सांगितलेच आहे. यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की, स्त्री व पुरुष यांच्या वयात ५ वर्षांचे तरी अंतर असले पाहिजे. विसाव्या वयाला स्त्रीच्या देहाची व मनाची जी वाढ होते तीच पुरुषामध्ये होण्याला २५ वे वर्ष येते. म्हणून हा फरक असणे जरूर आहे. काहींच्या मते जास्तीत जास्त अंतर दहा वर्षे असण्यास हरकत नाही. पण त्यापेक्षा जास्त अंतर असणे पतिपत्नीचे वैवाहिक सुख आणि पुढील प्रजा या दोन्ही दृष्टीने अनिष्ट आहे. (डॉ. हेनरीक् कीश् पृ. १६२) (डॉ. लोवन फील्ड पृ. २८) यावरून १२ वर्षाची मुलगी व ३० वर्षाचा मुलगा किंवा ८ वर्षाची मुलगी व २४ वर्षाचा मुलगा असावा हे मनूचे मत (मनुस्मृति ९.९४) विज्ञानाला मान्य नाही, एवढे तरी लोकांनी ध्यानात घ्यावयास हवे. धर्म, परलोक, मोक्ष