पान:विज्ञान-प्रणीत समाजरचना.pdf/१६०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१५४)

या दृष्टीने मुलगी किती वर्षाची असावी हे सांगणे शक्य नाही. कारण या बाबतीत कोणालाच काही माहीत नसते. आणखीही एक गोष्ट अशी ध्यानात येईल की पुरुषाला तीस-पस्तीस वयानंतर विवाहाला परवानगी ठेवून स्त्रीला पुनर्विवाहाची बंदी ठेवणे हे सुप्रजेच्या दृष्टीने फार घातुक आहे. (कारण त्या पद्धतीने पतिपत्नीच्या वयात फार फरक पडतो.)
 पुनर्विवाहाच्या बाबतीत आणखीही एक दोन मुद्यांचा विचार करणे अवश्य आहे. ज्या पुरुषाशी स्त्री समागम करते त्याच्या वीर्याचा परिणाम तिच्यावर कायम राहून पुढे तिने दुसरा पति वरिल्यास त्या प्रजेवर पहिल्याचे परिणाम होतात असा पूर्वी समज होता. यादृग्गूणेन भर्त्रा स्त्री संयुज्येत यथाविधि । तादृग्गुणा सा भवति समुद्रेणेव निम्नगा- (मनु ९-२२) या श्लोकात हेच तात्पर्य असावे असे वाटते. आणि यामुळेचं प्राचीन शास्त्रकारांनी स्त्रीला पुनर्विवाहाची बंदी केली असावी पण एक तर ही कल्पना आता असिद्ध ठरली आहे. इंग्रजीत हिला टेलिगनी असे नाव आहे व टेलिगनी असिद्ध आहे असे आता शास्त्रज्ञांनी मान्य केले आहे. (सायन्स ऑफ लाइफ- हक्सले व वेल्स, पृ. ३१०) मागल्या लोकांचा टेलिगनीवर विश्वास होता म्हणून त्यांनी विधवा पुनर्विवाहास बंदी करणे युक्त होते असे कोणी म्हणेल व त्यात थोडासा सत्यांशही आहे. पण केवळ सुप्रजेच्या दृष्टीने पाहिल्यास अक्षतयोनि स्त्रियांना ही बंदी त्यांनी करावयास नको होती. पण तीही त्यांनी केली आहे. यावरून स्त्रीच्या सुखाचा ते सर्वांगीण विचार करीत नसत हेच दिसते. आणि हे नियम केवळ सुप्रजेच्या दृष्टीनेच केले नव्हते हेही यावरून दिसते. आणि मग मोक्षाच्या दृष्टीने केले असल्यास स्त्रीने पुन्हा लग्न केल्यास तिला मोक्ष मिळणार नाही, व पुरुषाने केले तरी त्याला मिळेल हे त्यांनी कसे ताडले असावे हे नेमके ध्यानात येणे फार कठिण आहे. ते काही असले तरी, स्त्री पुरुषांच्या वयात फार अंतर असणे घातुक आहे, टेलिगनी असिद्ध आहे, आणि स्त्रीला जीवितात सुख लागले तरी चालेल असा नवा दृष्टिकोन आहे, म्हणून पुनर्विवाहाला बंदी करणे युक्त होणार नाही.
 प्रेमविवाह हा विवाहाचा नवीनच प्रकार अलिकडे रूढ होत आहे. तो अत्यंत इष्ट आहे यात शंकाच नाही. पण त्या बाबतीत बऱ्याच भ्रामक समजुती रूढ झाल्या आहेत त्यांचा विचार केला पाहिजे. जिचे मी तोंडही