पान:विज्ञान-प्रणीत समाजरचना.pdf/१६१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१५५)

पाहिले नाही त्या मुलीशी माझा संसार सुखाने कसा व्हावा, अशा तऱ्हेचा प्रश्न प्रेमविवाहाच्या बाजूने लोक विचारतात. पण यात गृहीत धरलेली कल्पना चूक आहे. कारण पूर्ण परिचयानंतर, मनं एकमेकांवर पूर्णपणे अनुरक्त झाल्यानंतर जरी विवाह केला तरी तो सुखाचा होतोच असे नाही. युरोपांतील बहुतेक सर्व विवाह प्रेमविवाहच होतात. तरी कित्येक वेळा विवाहाच्या दुसऱ्याच दिवशी घटस्फोटासाठी अर्ज झालेले दिसतात. 'ट्रू स्टोरी' या अमेरिकेतील मासिकात बहुतेक सर्व कथा प्रेमाच्याच आहेत. त्या वाचल्या म्हणजे प्रेम ही एक फार विचित्र कल्पना आहे, तिला नियम असा एकही सांगता येणार नाही असे स्पष्ट दिसून येते. विवाहाच्या आधी असलेले प्रेम दोन दिवसात किंवा कित्येक वेळा दहा वर्षांनी सुद्धा नाहीसे होते. तर उलट आरंभी मुलीचे प्रेम नसताना विवाहानंतर हळूहळू प्रेम जडते. पुष्कळ प्रेम जडले असे वाटून विवाह करावा तर काही वर्षांनी असे ध्यानात येते की अरे ते खरे प्रेम नव्हते ती केवळ विषयवासना होती. प्रेमाचे प्रकार हे असे आहेत. पण उलट लहानपणी आईबापांनी लग्ने लावून दिली तर ती सुखाची होतात हेही खरे नाही. म्हणून शेवटी विवाहातील सौख्य हे केवळ नशिबावर अवलंबून आहे हे जेन ऑस्टिनचे म्हणणेच खरे वाटू लागते. पण हे काही असले तरी विवाहाला पतिपत्नीमधील प्रेम अवश्य आहे हे निर्विवाद आहे. आणि ते प्रेम दोन व्यक्ती जितक्या सम संस्कृतीच्या असतील तितके जास्त शक्य आहे हेही खरे आहे. या बाबतीत जुने लोक नेहमी असे विचारतात की आमच्या बायका शिकलेल्या नव्हत्या तरी आमचे काय बिघडले? आमचे संसार सुखाचे झालेच ना? यावर या लोकांना असा प्रश्न विचारता येईल की समजा जातिभेदाचे निर्बंध आपल्याकडे नाहीत, तर अशा स्थितीत कैकाड्याच्या मुलीशी तुम्ही लग्न कराल का? आणि करणार नसाल तर का करणार नाही? हे लोक या प्रश्नाला नेमके उत्तर देऊ शकणार नाहीत. पण आपल्याला देता येईल. ते उत्तर असे की कैकाडीण अशिक्षित असते आणि यांनी निवडलेली मुलगी सुशिक्षित असते. यांच्या ज्या स्वच्छतेच्या कल्पना असतात, त्याच तिच्या असतात आणि कैकाडणीच्या नसतात. रोज अंग धुवावे, वस्त्रे स्वच्छ असावी, केसात उवा नसाव्या या गोष्टी मराठे, ब्राह्मण, प्रभू, इत्यादि उच्च वर्गातल्या मुलींना शिकविलेल्या असतात. त्याचप्रमाणे राम,