पान:विज्ञान-प्रणीत समाजरचना.pdf/१६२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१५६)

सीता ही नावे उच्चारली तर ब्राह्मण मुलीला काही बोध होतो तो कैकाडणीला होत नाही. आणि या मुलीला हा बोध होतो म्हणूनच या वरील मंडळींचा संसार तिच्याशी सुखाने होऊ शकतो. स्वच्छता नसेल, राम सीता, रामायण, महाभारत या कल्पनाच माहीत नसतील, शुद्धवाणीचा अभाव असेल. विनयाचे शिक्षण नसेल तर जुन्या लोकांनाही संसारात राम वाटणार नाही. आणि ते त्या वेळी जे उद्गार काढतील त्याची भाषा जरी निराळी असली तरी त्याचा अर्थ हाच असेल की स्त्री सुशिक्षित नाही. त्या वेळी जर कैकाडी जवळ असला तर तो असेच म्हणेल की माझा संसार कोठे वाईट झाला? राम सीता माहीत नसले म्हणून काय बिघडले? केस रोज विंचरले नाहीत म्हणून काय झाले? त्याचा हा प्रश्न जसा वेडगळ तसाच मुलीला कालिदास, शेक्सपियर नाही आला म्हणून काय झाले, केशरचना सुरेख आली नाही म्हणून काय बिघडले हाही प्रश्न वेडगळ आहे. याचा अर्थच असा की आचार विचारांच्या ज्या पायरीवर मी उभा आहे. त्याच पायरीवर माझी पत्नी उभी असावी असे पुरुषाला वाटत असते.
 वेस्टर मार्कने आपल्या फ्यूचर ऑफ मॅरेज या ग्रंथात आपले म्हणून नमूद केलेले अनुभव या दृष्टीने मननीय आहेत. तो म्हणतो- पतीच्या बौद्धिक जीवनात स्त्री जेथे सहकार्य करते तो विवाह जितका सुखप्रद होतो तितका इतर कधीच होत नाही. आणि सांस्कृतिक समता हेच या सुखाचे कारण म्हणून त्याने दिले आहे. त्यात असेही सांगितले आहे की कॉलेजमध्ये एकत्र शिकत असलेल्या तरुण-तरुणीमध्ये जे विवाह होतात त्यात सुखी दंपतीचे प्रमाण इतर विवाहापेक्षा पुष्कळच जास्त असते. अमेरिकेतील एकंदर विवाहात दर ७ विवाहात १ घटस्फोट होतो. तर कॉलेजमधून झालेल्या विवाहात ७५ विवाहास १ घटस्फोट असे प्रमाण पडते (पृ. ४१) . या गोष्टीचाही अर्थ असाच की पतिपत्नी समभूमिकेवर असतील तर विवाह जास्त सुखप्रद होतो. सायन्स ऑफ लिव्हिंग या पुस्तकात अलफ्रेड ॲडलर याने हेच मत दिले आहे. तो म्हणतो की पतिपत्नीचे नाते जेव्हा पूर्ण समतेचे असेल तेव्हाच प्रेमाला योग्य मार्ग लागून विवाह सुखाचा होईल.
 प्रेमविवाहाला, आणि स्त्रीपुरुषांच्या सांस्कृतिक समतेला शास्त्रज्ञ पाठिंबा देत असले तरी दर्शनी प्रेम, हुरळते प्रेम, शब्दांतीत असलेले असे काही प्रेम