पान:विज्ञान-प्रणीत समाजरचना.pdf/१६३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१५७)

याचा ते निषेधच करतात. प्रेम हा विकार असला तरी विचाराच्या सुकाणूवाचून जर तो भरकटू लागला तर विवाहनौका खडकावर आपटण्याचा संभव जास्त आहे असे त्यांचे मत आहे. प्रेमविवाह (Love marriage) आणि विचारपूर्वक केलेला विवाह (marriages of reason) असा फरक करून दुसऱ्या पद्धतीने केलेले विवाह जास्त सुखप्रद होतात असे ब्लॉक् याने आपले मत दिले आहे (Sexual life of our Times पृ. २०४) वेस्ट मार्कचेही मत तेच मत आहे.
 या सर्वांचा निष्कर्ष असा की विवाहात आणि विवाहापूर्वी प्रेम हे अत्यंत आवश्यक असले तरी ते आंधळे असून उपयोगी नाही. व्यक्तीचे कुल, शिक्षण, तिचे आचारविचार हे जितके सम असतील तितकी प्रेमाला स्थिरता जास्त येणार असल्यामुळे केवळ दर्शनी प्रेमाकडे लक्ष न देता वरील सर्व गोष्टींकडे लक्ष पुरविले पाहिजे. इतकेच नव्हे तर आरोग्य, सांपत्तिक स्थिती या गोष्टीचाही त्यांत विचार झाला पाहिजे. हा सर्व विचार वधूने किंवा वराने एकट्यानेच करावा असे कोणीच म्हणणार नाही. पण आपले एकमेकांवर प्रेम बसेल का नाही याचा जो काही थोडा अदमास करावयाचा तो त्यांना बराच शक्य असल्यामुळे त्यांना त्यांत प्राधान्य दिले पाहिजे त्यात वादच नाही. त्या वयात ते विकारी असल्यामुळे वाटेल ती निवड करतील हे म्हणणे युक्त वाटत नाही. कारण एक तर ते खरे नसते. आणि दुसरे म्हणजे आईबाप हे कामविकारांनी वाहवलेले नसले तरी इतर अनेक विकारांनी वाहवलेले असतात. हुंड्याच्या आकड्यावर मुलामुलीचा सवदा पटविणारे पुष्कळ आई- बाप आजही आहेत. म्हणून पतिपत्नीनाच स्वतःची निवड करू देणे हे फार इष्ट आहे. प्रेमाची शक्यता त्यात जास्त आहे हे तर खरेच, पण दोघांच्याही व्यक्तित्वाला त्यात अवसर मिळाल्यामुळे त्यात मनाचा विकासही साधत असतो. माझ्यामते तर हाच फायदा सर्वात मोठा असतो प्रेमविवाहाच्या बाबतीत हॅवलॉक एलिसचे मत पुढील प्रमाणे आहे. प्रेमाने ज्या निवडी होतात त्या वाटेल तशा व समाजाला हानिकारक होतात असे नाही, तर उलट हितप्रदच होतात. प्रेम हे आंधळे असते हे तितकेसे खरे नाही. त्यातही काही नियम सापडतात. इतकेच नव्हे तर सुप्रजाशास्त्राने केलेली निवड आणि प्रेमाने केलेली निवड यात फारसा फरक पडणार नाही. (टास्क ऑफ सोशल हायजिन