पान:विज्ञान-प्रणीत समाजरचना.pdf/१६४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१५८)

पृ. २०५, २०९). असे खरोखरच असेल तर फारच चांगले आहे.
 या सर्व विवेचनाचा सारांश असा की स्त्रीपुरुषांतली उत्कट मैत्री हे विवाह संस्थेचे जे ध्येय आहे तिला प्रेम हे अत्यंत अवश्य आहे. पतिपत्नीमध्ये सांस्कृतिक समता जितकी जास्त तितकी प्रेमाची शक्यताही जास्त असते आणि मातृपितृपदाची जबाबदारी ज्यांच्यावर टाकण्यास आपण तयार होतो त्यांच्यावर परस्परांची निवड करण्याची जबाबदारी टाकणे हे मुळीच वाईट नाही. स्त्रीपुरुषांची उत्कट, अनन्य मैत्री हे एक अत्यंत श्रेष्ठ प्रकारचे मानसिक सुख आहे आणि पूर्ण आत्मनिग्रह करूनच ते मिळविणे शक्य असते अनन्यतेची भूक सर्वांनाच असते पण मनाची विशेष वाढ झालेली असल्याखेरीज ते अनुभवण्याची पात्रता व्यक्तीला कधीच येत नाही. 'वूमनस् बेस्ट इयसस' या पुस्तकांत वुल्फ म्हणतो 'एक पत्नी हा विवाहाचा अत्युच्च प्रकार होय. पण या श्रेष्ठ सुखाचा आस्वाद घेण्याइतकी फारच थोड्या व्यक्तींची मानसिक वाढ झालेली असते.' लेखकाचे हे म्हणणे अगदी खरे आहे आणि म्हणून इतर मानसिक सुखाची आवड समाजात वाढविणे हे जसे समाजनेत्यांचे काम आहे तसेच या सुखाची आवड वाढविणे हेही आहे. आपण अनन्य न होता दुसऱ्यानेच फक्त असावे अशा असत् अभिरुचीचेच सामान्यतः लोक असतात. म्हणजे अनन्य निष्ठेची किंमत अनन्य निष्ठेने देण्यास लोक तयार नसतात. ती देण्यास लोक ज्या समाजात जास्त तयार होतील तो समाज जास्त सुखी होईल.
 आतापर्यंत जे विवेचन केले ते केवळ शास्त्राकडे दृष्टी ठेवून, उत्तम व्यवस्था कशी असू शकेल. या धोरणाने केले. पण मानवाचे मन, सृष्टीची रचना, आणि सृष्टिकर्ता कोठे असला तर त्याची शक्ती, ही सर्व दोषपूर्ण असल्यामुळे उत्तम म्हणून ठरविलेल्या नियमांना पावलोपावली अपवाद आणि मुरडी घालाव्या लागतात हे कोणाही जाणत्यांच्या ध्यानांत येईल. स्वाभिमान हा सद्गुण फार श्रेष्ठ असे आपण मानतो आणि त्यावाचून जिणे व्यर्थ असेही समजतो. पण व्यवहारात उतरलेल्या कोणाही माणसाचा अनुभव विचारला तर तो असेच सांगतो की स्वाभिमान ठेवून कोठेच चालत नाही. जेथे नमणे अत्यंत दुःसह वाटते तेथेही पावलोपावली नमावे लागते. सत्य भाषण करावे, क्षमावृत्ती असावी इत्यादि नियमांची हीच स्थिती आहे. असत्य