पान:विज्ञान-प्रणीत समाजरचना.pdf/१६५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१५९)

हे अपवादात्मक नसून जगाचा तोच नियम होऊन बसलेला दिसतो. आणि स्वाभिमान, सत्यनिष्ठा यांना चिकटून कोणी स्वतःचे नुकसान करून घेऊ लागला तर व्यवहारी लोक त्याला मूर्ख समजतात. स्वाभिमान पराकाष्ठेचा ठेवला तर केवळ व्यवहारी दृष्टीनेच तोटा होतो असे नसून ज्या स्वाभिमानासाठी आपण हाल सोसण्यास तयार होतो तोच उतरत्या स्थितीला लागतो. सृष्टिरचनेची ही अपूर्णता, हा दोष ध्यानात घेऊनच समाजातली कोणचीही संस्था उभारली पाहिजे. आणि विवाहाकडे याच दृष्टीने पाहिले तर घटस्फोटाला कोणचाही समंजस मनुष्य विरोध करणार नाही असे वाटते.
 आयुष्याच्या पहिल्या प्रहरात एकमेकांवर अनुरक्त झालेल्या सुदृढ तरुण-तरुणीनी संसार थाटावा, आणि शेवटच्या प्रहरांत दोघानीही एकदमच येथून जावे यापेक्षा जास्त सुंदर, रम्य मनोहर असे काय आहे ? पण या रम्यतेकडून जगाच्या उग्र, कठोर परिस्थितीकडे दृष्टी टाकली तर लगेच यापेक्षा जास्त अशक्य असे काय आहे असा अत्यंत खेदजनक प्रश्न मनापुढे उभा राहतो. या रम्य व्यवस्थेला आपल्या मृत्यूच्या दुर्लंघ्य नियमांनी सृष्टी पहिला तडाखा देते. पण तो तडाखा जेथे नाही तेथेही मानवाचे अपूर्ण मन पावलोपावली अनंत अडचणी निर्माण करून या सुंदर ध्येयाचे वाटोळे करून टाकीत असते. स्त्रीपुरुषांचे स्वाभिमान, एकमेकांवर कितीही निष्ठा असली तरी मधूनच निर्माण होणाऱ्या विवाहबाह्य कामवासनेच्या ऊर्मी, आपल्या घेऱ्यात धरून सर्वस्वाचा विध्वंस करून टाकणारी व्यसने, आणि मानवी स्वभावातले इतर अनंत दुर्गुण, यांनी आरंभी एकमेकांसाठी प्राणत्याग करण्यास तयार असलेल्या पतिपत्नीना पुढे पुढे एकमेकांचा सहवासही दुःसह होऊन जावा अशी भयाण परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे ध्येयदृष्टीला दिसणाऱ्या त्या रम्य दृश्यावरून डोळे ओढून घेऊन या बिकट परिस्थितीतून वाट काढण्यासाठी जरा कमी रम्य अशा दृश्यावर नजर ठेवावी लागते. पत्रिका पहाण्यासारख्या वेडगळ पद्धतीपासून एकमेकांचे स्वभाव अजमावणे, संस्कृतीची समता राखणे, आरोग्यदृष्ट्या तपासणे, आर्थिक स्थिती लक्षात घेणे, इत्यादी शास्त्रमान्य अशा पद्धतीपर्यंत कोणच्याही दृष्टीने कितीही काळजी विवाहाच्या आधी घेतली तरी शेवटपर्यंत विवाहसंबंध सुखप्रद राहतील अशी हमी देताच येत नाही. मानवी स्वभाव आणि सृष्टीतल्या घडामोडी आपल्याला इतक्या