पान:विज्ञान-प्रणीत समाजरचना.pdf/१६६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१६०)

अगम्य आहेत. असे असताना सर्वज्ञत्वाचा आव आणून एकदा जडविलेला प्रत्येक विवाहसंबंध आमरण कायम टिकलाच पाहिजे अशी सक्ती करणे हे सर्वथा अयुक्त होय. तसा उपदेश असावा यात वादच नाही. पण जेथे सहवास दुःसह होऊन सुखप्राप्ती होत नसेल तेथे त्यातून सुटण्यास समाजाने मार्ग करून दिला पाहिजे एवढेच दुसऱ्या पक्षाचे म्हणणे आहे
 विवाह हा फक्त स्त्रीपुरुषांच्याच सुखाचा प्रश्न नसून अपत्यांच्याही सुखदुःखाचा त्यात विचार होणे अवश्य आहे. म्हणून घटस्फोट मान्य करणे चूक आहे असा एक पक्ष आहे. पण कित्येक वेळा पतिपत्नीचे संबंध इतके विकोपाला गेलेले असतात, किंवा व्यसनामुळे किंवा अन्य कारणामुळे पुरुष इतका राक्षसी झालेला असतो की अपत्यांच्या हितासाठीच घटस्फोट अवश्य होऊन बसतो. आणि हे सर्व लक्षात घेऊनच घटस्फोट सुकर व्हावा असे आजचे सर्व विचारी पुरुष सांगत आहेत. घटस्फोटाचे प्रसंग कमी यावे असे त्यांनाही वाटते. पण कायदा हा त्यावर उपाय नसून शिक्षणाने मनाची संस्कृती वाढविणे हा उपाय आहे. असे त्याचे मत आहे.
 हिंदुस्थानात अनेक जातीत घटस्फोट रूढ आहे आणि काही वरच्या जातीत तो रूढ नसल्यामुळे त्या आपल्याला या बाबतीत श्रेष्ठ मानतात. एकनिष्ठा, शाश्वतता, आणि तज्जन्य सुख या बाबतीत त्या श्रेष्ठ आहेत हे खरेच आहे; पण घटस्फोटाची परिस्थितीच आपणापुढे नाही असा जो भोळसट मोठेपणा त्यांनी जिवाशी धरला आहे तो चूक आहे. पुरुषांनी या बाबतीत आपली सोय करून घेतलीच आहे. आणि मनूने त्यांना तशी परवानगीही दिली आहे. पती कितीही नीच, व्यसनी असला तरी त्याला देवासमान मानावे असे स्त्रियांना सांगणाऱ्या मनूनेच (५.१५४) स्त्री मर्जीप्रमाणे वागत नसेल, रोगी असेल, किंवा फार काय नुसती जास्त खर्चिक असेल तर पुरुषाने दुसरे लग्न करावे असा उपदेश केला आहे. (९.८०) आणि यामुळे जर ती पहिली स्त्री रागावून निघून गेली तर तिला टाकून द्यावी असा सल्ला दिला आहे. याच्या युक्तायुक्ततेचा विचार जरी केला नाही तरी यावरून एवढे खास दिसते की एकदा जडविलेला विवाहसंबंध आमरण टिकविलाच पाहिजे, तो मोडता येत नाही, असे आर्यांचेही मत नव्हते. मानवाचे अज्ञान व सृष्टिरचनेतली दोषपूर्णता लक्षात घेऊन ध्येयवादाला मुरड घालण्यास