पान:विज्ञान-प्रणीत समाजरचना.pdf/१६७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१६१)

आर्यांचीही हरकत नव्हती. फरक एवढाच की दुसरे लग्न करून आपण सुखी झाल्यानंतरही आपल्या पहिल्या स्त्रीने तिच्या माहेरी किंवा अन्यत्र आपल्या नावाने रडत असावे यात आर्य पुरुषाला जी लज्जत आहे ती घटस्फोटवादी पंडितांना नाही. आपल्याशी तिचे जमले नाही तर अन्य पुरुषांशी विवाह करून तिने सुखी होण्यास हरकत नाही असे त्यांना वाटते.
 घटस्फोटाचा पश्चिमेकडील इतिहास पाहिला तर तो कायद्याने बंद केला तर कमी होतो, किंवा कायद्याने परवानगी दिली तर जास्त वाढतो असे मुळीच दिसत नाही. आणि घटस्फोट सोपा केल्याने गृहसंस्थेचा नाश तर होणार नाहीच, तर उलट तेथली बजबज नाहीशी होऊन तिला जास्तच गांभीर्य प्राप्त होईल असे हॅवलॉक एलिस व वेस्टरमार्क या दोघां मोठया शास्त्रज्ञांचे मत आहे. (व्हिदर मनकाइंड पृ. २१४) आणि एकांगी घटस्फोटाच्या बाबतींत म्हणजे पुरुषाने स्त्रीला टाकण्याच्या बाबतीत मनूचेही तेच मत असल्यामुळे त्यांत थोडी सुधारणा केली तर सनातन्यांनाही ती मान्य करण्यास हरकत करू नये असे वाटते. पहिल्या स्त्रीला रडवीत ठेवण्यामध्ये जे सुख आहे ते नाहीसे होईल एवढाच तोटा त्यात आहे.
 प्रेमविवाह, पुनर्विवाह, घटस्फोट, संतति-नियमन, इत्यादि सुधारणा मान्य करण्यास पुरुष तयार होत नाहीत याचे कारण एकच आहे. स्त्री हा एक नाठाळ प्राणी असून बंधने शिथिल होताच वाटेल तो स्वैराचार करून समाजाच्या घाताला तो प्रवृत्त होईल, असली मनुप्रणीत मतेच त्यांनी अजून धरून ठेवलेली आहेत. समाजाच्या सुखाची काळजी, आणि जबाबदारी फक्त आपल्यालाच आहे असे त्यांना वाटते. पण आज शेकडो वर्षांच्या अनुभवाने ही कल्पना खोटी ठरली आहे. बौद्धिक क्षेत्रात पुरुषाची अल्पही बरोबरी स्त्रीने अजून केली नसली, तरी आत्मनिग्रह, निष्ठा, जबाबदारीची जाणीव आणि उच्च ध्येयासाठी प्राणाहुतीही देण्याइतकी उज्ज्वल तपश्चर्या, इत्यादि अनेक गुण स्त्रियांनी व्यक्त केले आहेत. वास्तविक स्मृतिकालाच्या पूर्वीच रामायण-महाभारतातील इतिहास घडला असल्यामुळे स्मृतिकारांच्या ही गोष्ट लक्षात यावयास हरकत नव्हती. पण अनुभव जमेस न धरता, परिस्थितीकडे न पाहाता या विषयात तरी रूढ कल्पनाच पुन्हा पुन्हा बडबडण्याच्या सनातन चालीमुळे शास्त्रकारांनी ही गोष्ट जमेला धरलीच