पान:विज्ञान-प्रणीत समाजरचना.pdf/१६८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१६२)

नाही. पण युरोप अमेरिकेतल्या आजच्या स्वैराचारी समजल्या जाणाऱ्या समाजाकडे जरी दृष्टी टाकली तरी बंधने अत्यंत शिथिल असतानाही वाटेल त्या परिस्थितीत एकनिष्ठ राहणाऱ्या, अलौकिक स्वार्थत्याग करणाच्या, निग्रही अशा अनेक स्त्रिया, संख्येनेही आर्य स्त्रियांशी तुलना होईल इतक्या स्त्रिया, त्या समाजांत निर्माण होतात असे दिसत असल्यामुळे स्त्रीच्या स्वभावाबद्दलचे स्मृतिकारांचे हीन मत आज कोणीही विचारी मनुष्य मान्य करणार नाही आणि त्यामुळे मानवी सुखात भर घालणाऱ्या वरील सुधारणांना तो विरोधही करणार नाही.
 स्त्री-स्वातंत्र्य, विवाहाचे वय, विधवाविवाह, प्रेमविवाह, घटस्फोट इत्यादि अनेक प्रश्नांची चर्चा करून शास्त्रज्ञांच्या मताने नव्या गृहसंस्थेचे स्वरूप कसे असावयास हवे आहे ते आपण पाहिले. आणि त्यामुळेच मानवाच्या सुखात भर पडून समाज जास्त बलिष्ठ होईल हेही आपल्या ध्यानात आले. अपत्य संगोपन, स्त्रीचे आर्थिक स्वातंत्र्य, सगोत्र विवाह यांशी संलग्न असलेल्या प्रश्नांची अजून चर्चा करावयाची आहे. ती पुढील प्रकरणी करून हा लांबलेला विषय आटपता घेऊ.