पान:विज्ञान-प्रणीत समाजरचना.pdf/१६९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



अपत्यसंगोपन व इतर काही प्रश्न.



 पहिल्या लेखात विवाहाच्या मूल हेतूंची चर्चा करून अनन्यनिष्ठेची मानवी मनाला असलेली पिपासा तृप्त करणं हे तिचे अंतिम ध्येय असे आपण ठरविले. नंतर ते धोरण डोळ्यापुढे ठेवून गृहसंस्थेचे नवे स्वरूप कसे असावयास पाहिजे याबद्दल चर्चा केली. आता गृहाच्या अंतर्गत व्यवस्थेशी सबंध असलेल्या काही प्रश्नांची चर्चा करावयाची आहे. या प्रश्नांतील पहिला आणि सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे अपत्यसंगोपन हा होय.
 फार पुरातन काळापासून समाजातील, बुद्धिजीवी वर्ग आणि बुद्धिजीवी नाही, पण सुखवस्तु आहे असा जो वर्ग, त्या वर्गातील लोकांच्या स्त्रिया चूल व मूल या उद्योगातच गढून गेलेल्या असत. शेतकरी, कोष्टी व इतर मेहनतीची कामे करणारे जे लोक त्यांच्या स्त्रियांना चूल व मूल संभाळून शिवाय नवऱ्याच्या उद्योगातही साहाय्य करणे भाग पडत असे. पण असे असले तरी शेती, वीणकाम ही कामे घराच्या आसपास असल्यामुळे व विशेषतः स्त्री त्यात बांधली जात नसल्यामुळे ती कामे अपत्यसंगोपनाच्या आड येत नसत. आणि त्यामुळे स्त्रीचा इतर उद्योग व अपत्यसंगोपन यात तेढ कधीच येत नसे. पण अलिकडे सुशिक्षित स्त्रियांत स्वातंत्र्य, समता या भावनांचा उदय झाला आणि काबाडकष्ट करणाऱ्या स्त्रियांच्या कामाचे स्वरूप बदलून गेले, आणि त्यामुळे अपत्य संगोपनाच्या बाबतीत नवीनच प्रश्न उपस्थित झाले आहेत.
 नव्या युगात सुशिक्षित स्त्रीला आपल्या व्यक्तित्वाची जाणीव झाल्यामुळे तिला आर्थिक स्वातंत्र्य हवेसे वाटू लागले. पण अपत्यसंगोपनाची जबाबदारी दिवसातून चोवीस तास सारखी अंगावर असल्यामुळे स्त्रीचे आर्थिक स्वातंत्र्य आणि तिच्यावर निसर्गाने लादलेले अपत्यसंगोपन यामध्ये विरोध निर्माण झाला. तेव्हा दळणकांडण, शिवणटिपण, आणि पश्चिमेकडे तर स्वयंपाकही, ही कामे पुष्कळशी बाजारात होऊ लागल्यामुळे त्या कामातून स्त्री जशी मोकळी झाली, तशीच ती अपत्य संगोपनाच्या जबाबदारीतूनही मोकळी होऊ शकेल की काय, विज्ञानाला तिला त्यातून सोडवून पुरुषाशी सर्व दृष्टीने