पान:विज्ञान-प्रणीत समाजरचना.pdf/१७०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१६४)

समभूमीवर आणून सोडणे शक्य होईल किंवा असे या प्रश्नांचा विचार नवे लोक करू लागले.
 अंगमेहनत करणाऱ्या स्त्रियांच्या संसारावरही नव्या परिस्थितीचा परिणाम झालेला आहे. एवढे खरे की त्यांची पूर्वीची स्थितीही मोठीशी समाधानकारक नसल्यामुळे त्यांच्या पूर्वीच्या आणि आताच्या जीवनातील फरक वरच्या वर्गातील स्त्रीच्या जीवनात पडू पाहणाऱ्या फरकाइतका जाणवत नाही. दारिद्र्य आणि अज्ञान यामुळे या वर्गाची संस्कृती अगदी हीन असल्यामुळे निसर्गनियमाने प्रजा होणे व ती वाढणे या पलिकडे अपत्यांना काही धोरणाने हेतुपुरस्पर वाढविणे ही संगोपनाची कल्पना त्यांच्यात मुळातच नव्हती. आईला पोटासाठी कष्ट करणे प्राप्त असल्यामुळे अपत्याकडे सारा वेळ लक्ष देणे तिला पूर्वीही शक्य नव्हते. पण असे असले तरी, म्हणजे त्यांची स्थिती पूर्वीही अगदी असमाधानकारक होती हे खरे असले तरी हल्ली ती त्यापेक्षाही वाईट झाली आहे हेही खरेच आहे. कारण बाळंतपणाची वेळ अगदी जवळ आली म्हणजे जुन्या काळी, काम घरचेच असल्यामुळे, स्त्रीला थोडीतरी विश्रांती घेणे शक्य होते. तसेच मूल आजारी असले म्हणजे तिला घरी बसणे शक्य होते. आणि कोष्टी, विणकरी यांची पुष्कळशी कामे घराच्या आसपास असल्यामुळे मुलाकडे वरचेवर लक्ष देणे हेही तिला शक्य होते. पण अलिकडे गिरण्या व इतर कारखाने यांमध्ये स्त्री ही कामाला बांधली जात असल्यामुळे वर सांगितलेल्या अल्प सोयीही नष्ट झाल्या आहेत. आणि त्यामुळे अपत्यांच्या आरोग्यावर फार वाईट परिणाम होत आहे.
 अशा तऱ्हेच्या अनेक अडचणींमुळे अपत्य- उत्पादनाचे नाही तरी निदान अपत्य संगोपनाचे काम स्त्रीकडून काढून घरातील इतर कामांप्रमाणेचं सामुदायिक पद्धतीने केले तर बरे असे काही विचारी लोकांना वाटू लागले.
 यातच आणखी काही तात्त्विक विचार करणाऱ्या लोकांच्या अनुकुलतेची भर पडली. सामान्यतः स्त्री ही अशिक्षित असते त्यामुळे व ती कितीही शिकली तरी त्याच विषयाला वाहून घेतलेल्या परिचारिकेइतकी ती निपुण होणे शक्य नसल्यामुळे अपत्य संगोपनाला आई ही लायकच नाही असे काही पंडित सांगू लागले. याशिवाय सामुदायिक पद्धतीचे इतर जे फायदे तेही प्रत्येक घरी मुले निरनिराळी वाढविल्याने मिळत नाहीत असे दिसू लागले.