पान:विज्ञान-प्रणीत समाजरचना.pdf/१७१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१६५)

मुले एकत्र ठेवली म्हणजे अनेकांना मिळून एक डॉक्टर मिळू शकतो, खेळण्याची नाना तऱ्हेची साधने घेणे परवडते व इतरही आरोग्यकारक परिस्थितीचे फायदे मिळू शकतात प्रत्येकाची मुले निरनिराळी ठेवली तर हे कधीच शक्य नाही. याही दृष्टीने घरामध्ये मुले वाढविण्यापेक्षा त्यांच्यासाठी स्वतंत्र संस्था काढूनच त्यांना वाढविणे बरे असे लोकांना वाटू लागले.
 अशा तऱ्हेचे विचारप्रवाह सुरू झाल्यावर त्याअन्वये तशी व्यवस्थाही काही ठिकाणी सुरू झाली. मातेला व अपत्याला मुद्दाम कायमचे वियुक्त करून अपत्याचे संगोपन करणाऱ्या संस्था फारशा निघाल्या नाहीत हे खरे ! पण मातेचा मृत्यू किंवा इतर काही पापमय कारणे यानी आपोआप मातेपासून तुटलेली जी बालके त्यांच्यासाठी संस्था स्थापन करण्यात आल्या व तेथे आपल्या अपत्य संगोपनाच्या नव्या कल्पना कितपत यशस्वी ठरतात याचा अनुभव त्या विचाराचे समाजसुधारक पाहू लागले.
 या संस्थांतील बालकांची स्थिती पाहून शास्त्रज्ञांनी जे अनुभव नमूद करून ठेवले आहेत, त्यावरून पाहाता अपत्याला आईपासून वियुक्त करून त्याचे स्वतंत्रपणे संगोपन करण्याची कल्पना ही अत्यंत हानिकारक असून अपत्याचे आरोग्य व मानसिक वाढ या दोन्ही दृष्टींनी ती अतिशय घातुक आहे असे आढळून आले आहे.
 अगदी एकदोन वर्षाच्या आतील लहान बालकांच्या आरोग्यापासूनच या प्रश्नाचा विचार करण्यास आपण सुरुवात करू.
 मुलाचे संगोपन आईकडूनच होण्यात मुख्य मुद्दा आईच्या अंगावरच्या दुधाचा असतो. आणि अनुभवाअंती असे आढळले आहे की आईच्या अंगावर न पिणाऱ्या मुलामध्ये अंगावर पिणाऱ्या मुलापेक्षा मृत्यूचे प्रमाण तिप्पट असते. बर्थ कंट्रोल अँड युजेनिक्स या निबंधात हॅवलॉक एलिस याने हे मत सांगितले आहे. वरचे दूध पिणाऱ्या मुलात मृत्यूचे प्रमाण जास्त असतेच; पण आईखेरीज इतर स्त्रीच्या अंगावरचे दूध पिणाऱ्या मुलातही मृत्यू जास्त होतो असे तो म्हणतो. मात्र हे प्रमाण त्या बाबतीत तिपटीवरून दुपटीवर येते, एवढीच बरी गोष्ट आहे. लिऑनस् येथील संस्थेवरील अधिकारी व्हिट्रे याचाही अनुभव असाच आहे. अंगावरचे दूध पिणारी मुले शे. १२ मेली तर वरचे दूध पिणारी शे. ३३ मरतात असे त्याने म्हटले आहे. (अपत्य संगोपना-