पान:विज्ञान-प्रणीत समाजरचना.pdf/१७२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१६६)

संबधाची ही व पुढील माहिती आणि काही अवतरणे डॉ. वेस्टरमार्क यांच्या फ्यूचर ऑफ मॅरेज इन् वेस्टर्न सिव्हिलिझेशन या पुस्तकांतून घेतली आहेत. पृ. १५९ ते १६४) हे झाले आरोग्यासंबंधी. मुलांच्या मनाच्या विकासाच्या बाबतीतही शास्त्रज्ञांचे मत संस्थांतील संगोपनाला प्रतिकूलच आहे. अमेरिकेत १९३१ साली व्हाइट हाऊस कॉन्फरन्स ऑन चाइल्ड हेल्थ अँड प्रोटेक्शन या नांवाची एक परिषद भरली होती. तिच्यांतील शास्त्रज्ञानी असा अभिप्राय दिला आहे की अपत्यांच्या मनोविकासाला गृहातील जीवन अत्यंत अवश्य आहे. संस्थेतील जीवनात मनोविकास होणे शक्य नाही. फ्लॉइड डेल याने तर थोडे पुढे जाऊन असे सांगितले आहे की, संस्थेतील मुले अगदी हीन, दुर्बल व तेजोहीन अशी होतात. असा अनुभव आल्यामुळे अमेरिकेतील डॉक्टरांनी एक नवीन पद्धत सुरू केली. अनेक कारणाने अपत्यहीन असलेल्या स्त्रियांची संख्या अमेरिकेत बरीच मोठी आहे. अशा स्त्रियांना अपत्याची हौस अनिवार असते. तेव्हा हे लक्षात घेऊन या डॉक्टरांनी अशा स्त्रियांना सस्थेतील मुले कायमची दत्तक देण्याची पद्धत सुरू केली. आणि आश्चर्याची गोष्ट अशी की संस्थेतील वैद्यकीय मदत, निष्णात दायाची शुश्रूषा, शास्त्रीय पद्धतीची उपकरणी व खेळ यापैकी कांहीही या दूधघरामध्ये (Foster Homes) नसूनही तेथे या बालकांची वाढ पुष्कळच चांगल्या प्रकारे होऊ लागली.
 या मुद्याला वरवर दिसते त्यापेक्षा फारच विलक्षण महत्त्व आहे. संस्थेपेक्षा आईजवळ मूल चांगले वाढावे हे सयुक्तिक दिसते. कारण तेथे अंगावरचे दूध आणि खरी ममता यांचा प्रश्न असतो. पण खरी आई सोडली तर इतर कोणाही व्यक्तीपेक्षां सर्व साधनांनी सिद्ध अशी संस्था श्रेष्ठ ठरेल असेच कोणालाही वाटेल. पण तसे न होता संस्थेपेक्षा दूधघर व दूधबाई (Foster Mother) हीच श्रेष्ठ ठरतात असे का हावे ?
 पती आणि पत्नी यांच्या बाबतीत अनन्यनिष्ठेचे जे तत्त्व सांगितले, तेच येथेही लागू पडते, असे थोड्या विचाराअंती ध्यानात येईल. युरोपातील इस्पितळांतील दाया अलीकडे पुष्कळच चांगल्या असतात. भाडोत्रीपणा त्यांच्यांत मुळीच नसतो. तरी पण अनेक मुले एकीच्या ताब्यात असल्यामुळे आणि तीही वरचेवर बदलत असल्यामुळे सर्वस्वी एकटीच्या स्वाधीन केलेल्या