पान:विज्ञान-प्रणीत समाजरचना.pdf/१७३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१६७)

बालकावर स्त्री जसे वात्सल्य ओतू शकेल तसे दाईला कालत्रयीही शक्य नाही. हे मूल कायमचे आपले आहे व दुसऱ्या कोणाचे नाही व पुढेही होणार नाही ह्या कल्पनेत काही निराळाच रस आहे. आणि त्याच्या बळावरच अहोरात्र कष्ट करून या रोपट्याला वाढविण्याची शक्ती स्त्रीच्या अंगी येत असते. आणि सर्व साधनांनी युक्त अशा संस्थेपेक्षा सामान्य घरांत, मानलेल्या आईजवळही मुले चांगली वाढतात, या अनुभवावरून मोठ्या वयात जाणतेपणी जी अनन्य निष्ठेची भूक व्यक्तीला असते, तीच लहान वयात नेणतेपणी का होईना, पण बालकालाही असते असे म्हणावे लागते. आज, उद्या आणि पुढे अनंत काळपर्यंत हे बालक आपले आहे ही जाणीव, हे समाधान स्त्रीला असल्यामुळे ती त्याची अनन्यभावनेने जोपासना करते. आणि आरोग्याच्या साधनापेक्षा त्या बालकाला या अनन्य प्रेमाचीच अपेक्षा जास्त असल्यामुळे त्याच्या मनाची व त्याचमुळे शरीराचीही वाढ तेथेच चांगली होते.
 गृहसंस्थेत आमूलाग्र क्रान्ती करून टाकणाऱ्या रशियातही अपत्य संगोपनाच्या बाबतीत हाच अनुभव आला आहे. बालके व माता यांच्या संरक्षणासाठी रशियांत जे स्वतंत्र सरकारी खाते आहे त्यावरील मुख्य अधिकारी डॉ. लिबिदेवा यांनी अगदी निःसंदिग्ध भाषेत आपले मत दिले आहे. त्या म्हणतात, सध्या तरी आमच्या सरकारी संस्थापेक्षा गृहामध्येच अपत्ये चांगली वाढतात. मानसिक व शारीरिक अशा दोन्ही दृष्टीने आमच्या संस्थांतील बालके गृहांतील बालकांपेक्षा दुबळी असतात, असे प्रत्येक ठिकाणी आढळून आले आहे.
 याचा अर्थ हाच की भिन्नतेची व तज्जन्य उत्कट प्रेमाची मानवी मनाला फार आवश्यकता आहे. त्याच्या अभावी मानवाचे शरीरबळ, मानसिक बळ व कर्तृत्व सर्वस्वी नष्ट होईल; आणि हे ध्यानांत घेतले तर अपत्य संगोपनाच्या जबाबदारीतून स्त्री कधीही मोकळी होणे शक्य नाही, असे दिसेल.
 पण या बाबतीत असे बजावून लिहिण्याची जरूरच नाही. कारण अपत्यसंगोपन ही जशी जबाबदारी आहे, त्याचप्रमाणे ते एक फार श्रेष्ठ प्रकारचे सुखही आहे, आणि ते स्त्रीला आहे एवढेच नसून पुरुषालाही आहे.