पान:विज्ञान-प्रणीत समाजरचना.pdf/१७४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१६८)

तेव्हा या जबाबदारीतून स्त्री मोकळी होणार नाही असे म्हणण्यापेक्षा, राष्ट्रीय भावनांचे संस्कार, आरोग्य, मानसिक वाढ इत्यादी हेतुसाठीही अपत्ये आईपासून दूर करून शास्त्रज्ञ तिचे सुख हिरावून घेऊ शकणार नाहीत, असेच म्हणणे अनेक स्त्रियांना पसंत पडेल.
 पण मग स्त्रीच्या आर्थिक स्वातंत्र्याचा प्रश्न कसा सोडवावयाचा असा पेच येऊन पडतो. स्त्रीच्या किंवा कोणाच्याही व्यक्तित्वाच्या विकासाला आर्थिक स्वातंत्र्याची अत्यंत आवश्यकता आहे. चाळीसपन्नास रुपयेच का असेनात, पण ते माझे स्वतःचे आहेत व त्यांच्या जोरावर जगात मी स्वतंत्रपणे राहू शकेन, या जाणिवेची पुरुषी मनाच्या विकासाला जशी आवश्यकता असते अशीच स्त्रीच्या मनालाही असते. माझी मी स्वतंत्र आहे ही भावना कर्तृत्वाच्या उदयाला अत्यंत अवश्य आहे. मला तर असे वाटते की आजपर्यंत स्त्रीला मानवी संस्कृतीच्या कोणच्याही अंगात विशेष कर्तृत्व जे कधीच दाखविता आले नाही, त्याचे कारण हेच असावे. विज्ञान, वाङमय, कला, राजकारण, इत्यादी बाबतीत शरीरसामर्थ्याची अपेक्षा नसूनही स्त्रिया उच्च पदाला कधीच फारशा गेल्या नाहीत. चूल आणि मूल या उद्योगाने त्यांना इकडे लक्ष देण्यास वेळ होत नाही, हे एक कारण आहे. पण ते तितकेसे विचारांत घेण्याजोगे नाही. कारण दिवसांतून पंधरापधरा ताससुद्धा पोटासाठी काम करणाऱ्या वर्गातून अनेक थोर पुरुष उदयाला आले आहेत. शिवाय ज्याच्या स्त्रियांना चूल व मूल हे उद्योग पुष्कळ अशी नोकरांवर सोपविता येतील, असा वर्ग प्रत्येक समाजात असतोच. त्यांच्या स्त्रियांनीही म्हणण्यासारखे पुरुषी तोलाचे कर्तृत्व फारसे दाखविलेले नाही. तेव्हा वेळाचा अभाव हे तितकेसे निर्णायक कारण होऊ शकणार नाही. क्षणाक्षणाला प्रत्येक बाबतीत प्रत्यक्ष भासमान होणाऱ्या परीधीनपणामुळे स्त्रीच्या मनाची वाढच होणे शक्य झाले नाही. हे ते कारण असावे असे वाटते. नवनिर्मितीची प्रतिभा (Originality) स्त्रीच्या मनाला मुळीच नाही, असे अनफेअर सेक्स या पुस्तकांत व्हाइट हेडने म्हटले आहे. आणि आतापर्यंतच्या इतिहासावरून ते खरे आहे असे दिसते. पण आतापर्यंत तिच्यावर लादली गेलेली मानसिक गुलामगिरी हे त्यास कारण असावे असे वाटते. इंग्रजी अमदानीपूर्वीचा हिंदुस्थानचा एक हजार वर्षांचा इतिहास पाहिला तर स्वतंत्रपणे अभिजात नवी कृती करणारे पुरुष किती