पान:विज्ञान-प्रणीत समाजरचना.pdf/१७५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१६९)

सापडतील? ज्ञानेश्वर, भास्कराचार्य, एकनाथ, शिवाजी, रामदास ! संपली यादी, कला, विद्या, वाङ्मय, राजकारण, वैदिक संशोधन, शास्त्रीय संशोधन, नवीन सामाजिक विचार, या क्षेत्रात अत्यंत अल्प का होईना पण काही तरी नवीन कल्पना किंवा विचार काढणारे रीत दाखविणारे लोक तेव्हा हाताच्या बोटावर मोजण्याइतकेही झाले नाहीत. याचे कारण हेच की वेदान्त, श्रुति, स्मृति यांच्या एका विशिष्ट पन्हळीतूनच त्यांचे मन वहात होते. आणि वाटेल त्या पन्हळीतून वहावयास मोकळीक असल्यावाचून नवीन कल्पना सुचणे अशक्य आहे. तीच गोष्ट स्त्रीच्या बाबतीत झाली असावी. पूर्ण स्वातंत्र्यावाचून मनाचा विकास नाही आणि तो नसेल तर नाविन्य, प्रतिभा ही अशक्य आहेत युरोपच्या इतिहासात असेच दिसते. खिस्ती धर्माची भयंकर शब्दनिष्ठा जसजशी कमी होऊ लागली, तसतसे शास्त्रज्ञ निर्माण होऊ लागले. हा नियम गणितांतील नियमाइतका जरी खरा नसला, आणि गुलामी परिस्थितीही स्वतंत्र विचाराचे लोक निर्माण झाल्याची काही उदाहरणे असली, तरी नवनिर्मितीला बुद्धि योग्य होण्यास मनाच्या स्वातंत्र्याची जरूर आहे. हे फारसे विवाद्य असे वाटत नाही.
 पण स्त्रीच्या आर्थिक स्वातंत्र्याच्या आड चूल आणि मूल या दोन गोष्टी येतात त्यामुळे तो प्रश्न मोठा बिकट होऊन बसला आहे. पैकी चुलीचा प्रश्न सहज सोडविता येण्याजोगा आहे आणि युरोपातील राष्ट्रांनी तो बहुतेक व रशियाने तो पूर्णपणे सोडविलाही आहे. शिजलेले उत्तम अन्न बाजारात ठेवणे हे काही शक्यतेच्या पलीकडे नाही विज्ञानाच्या मदतीने वाटेल तितके अन्न अशा रीतीने बाजारात आणता येईल. आणि ते अन्न घरी आणून नेहमीप्रमाणेच जेवणे केली तर कुटुंबसुखांत कोणताही बिघाड होण्याचे मुळीच कारण नाही. सर्वानी मिळून एकत्र जेवणे याला किंमत आहे. याने सुख खास वाढते. पण अन्न स्वच्छ असल्यानंतर त्याचे शिजवणही घरात झाले असले पाहिजे या विचाराला तितकीशी किंमत नाही.
 पण अपत्याचा प्रश्न जास्त महत्त्वाचा आहे आर्थिक स्वातंत्र्य हवे असेल तर अन्न खानावळीत शिजवावे या व्यवस्थेला स्त्री कबूल होईल. पण अपत्याचे तसे नाही. आपल्याला अपत्य असावे, ही जबर वासना स्त्रीला असते आणि त्याचे संगोपन करावे यांत तिला पराकष्ठेचे सुख असते. आणि अप-