पान:विज्ञान-प्रणीत समाजरचना.pdf/१७९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१७३)

आपापसात विवाह होऊ नयेत असे शास्त्र आहे. मेहेंदळे व मराठे ही दोन उदाहरणे घेऊ. मेहेंदळे यांचे गोत्र विष्णुवर्धन व मराठे यांचे कपि. यांनी आपापसात लग्न करण्यास मुळीच हरकत नाही. मराठे कुळांत आलेल्या मेहेंदळ्यांच्या मुलीला जो मुलगा होईल तो अर्थातच कपिगोत्री होणार. त्या मुलीच्या भावाला झालेल्या मुलीचे गात्र विष्णुवर्धनच राहणार. पण असे जरी निराळे असले तरी त मुलगी या मुलाला सपिंड होते, म्हणून तिच्याशी लग्न करणे शास्त्रकारांच्या मते युक्त नाही.
 सगोत्र, प्रवर व सपिंडविवाहनिषेधाच्या अशा मर्यादा आहेत. यांतील पहिले दोन निषेध कडकपणे पाळले जातात. तिसर ब्राह्मणांच्याही सर्व पोटजातीत पाळला जात नाही मामे बहिणीशी लग्न करणाऱ्या ब्राह्मणांतही पुष्कळ पोटजाती आहेत.
 मगोत्र, सप्रवर व सपिंड विवाहाचा हा जो निषेध सांगितला आहे, याच्या बुडाशी पुढील तीन कल्पना गृहीत धरलेल्या आहेत.
 (१) गोत्राचे नाव हे रक्तसंबंधामुळेच मिळालेले नाव आहे.
 (२) प्रत्येक कुलाचे जे प्रवर सांगितलेले आहेत, ते त्या कुळांतील पूर्वजच होत; आणि
 (३) कितीही पूर्वीच्या काळी दोन व्यक्तीचे पूर्वज एक होते, असे ठरले तर ह्यांचा विवाह होणे प्रजेच्या दृष्टीने घातुक आहे.
 ऐतिहासिक आणि शास्त्रीय पद्धतीने या गृहीत गोष्टींचा विचार केला तर असे दिसून येईल की या तीनही असिद्ध आहेत आणि त्यामुळे वरील निषेध मानण्याचे यापुढे मुळीच कारण नाही.
 हिंदू एक्झोगॅमी या आपल्या ग्रंथात रा. करंदीकर यांनी फार बारकाईने या प्रश्नांचा विचार केला आहे. व त्यांनी केलेले विवेचन इतके पूर्ण व निःसंदेह आहे की कोणाही विचारी माणसाला ते पटण्यासारखे आहे. म्हणून त्याचाच येथे थोडक्यांत अनुवाद करतो.
 वेदकाळी सगोत्र विवाहाचा निषेध मुळीच नव्हता. गोत्रे व प्रवर हीच त्या काळी निश्चित झाली नव्हती. ती प्रथम ब्राह्मणकाळी झाली. समाज लहान असतो. तेव्हा व्यक्तीचे एकच नाव उल्लेखास पुरेसे असते. पण समाज मोठा होऊन व्यवहार वाढला म्हणजे निश्चितीसाठी कुलनामे देण्याची चाल