पान:विज्ञान-प्रणीत समाजरचना.pdf/१८०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१७४)

पडते. तेच ब्राह्मणकाळी होऊन गोत्रनामे निर्माण झाली. गोत्र ही आडनावाप्रमाणेच असून आडनावाप्रमाणेच तीही निवासस्थान धंदा अध्ययन पद्धत, शाखा, धार्मिक मते, काही विशेष कर्तबगारी यावरून प्राप्त झालेली आहेत. बौधायनाच्या मताप्रमाणे पहिल्याने लक्षवधि गोत्रे होती. त्यांचे निरनिराळे गट पुढे करण्यात आले, त्यांनाच गण म्हणतात. गांधार, खांडव, गोदायन, सैंधव, पांचाल इत्यादि नांवे ही देशावरून पडलेली आहेत हे स्पष्ट दिसतेच आहे. फडणीस, जोशी, कुळकर्णी, पुणेकर, मिरजकर ही नावे धंदा किंवा रहाण्याची जागा यांवरून पडलेली आहेत. आणि म्हणून फडणीस असेच गांव दोन्ही कुळांचे असले तरी त्यांचा रक्तसंबंध असेल असे आपण मानीत नाही. पुष्कळ ठिकाणी तर त्या व्यक्ती भिन्न जातीच्याही असतात. गोत्रांची स्थिती तीच आहे.
 प्रवर म्हणजे त्या कुलांतील पूर्वज ही कल्पना चूक आहे. जे प्रवर आपल्या पठणात असतात ते पिता, पुत्र व नातू यांची नामे दर्शवितात असा समज आहे. असे समजल्याने अनेक घोटाळे होतात. कुंडिण गोत्राचे प्रवर वसिष्ठ, मित्रावरुण, व कुंडिण असे आहेत. यातील मित्रावरुण हा जुन्या वाङ्मयाच्या आधारानेच वसिष्टाच्यां पूर्वकालचा आहे. तेव्हां तो त्याचा मुलगा होऊ शकणार नाही. भारद्वाज गोत्राचे प्रवर भारद्वाज, बृहस्पति व आंगिरस. यांतील बृहस्पति व आंगिरसहे पितापुत्र नसून भाऊ होते, असे ऐतरेय ब्राह्मणांत म्हटले आहे. एका गौतम गणांत उच्यव्य, वामदेव, राहुगण व बृहदुक्थ अशा चार शाखा आहेत. या चारही गोत्रांचा पहिला प्रवर आंगिरस आहे. दुसऱ्या प्रवराच्या ठायी ते गोत्रानामच आहे. म्हणजे एकाचा उच्यथ, दुसऱ्याचा वामदेव वगैरे. आणि मौजेची गोष्ट अशी की या सर्वांचा तिसरा प्रवर पुन्हा एकच म्हणजे गौतम आहे. चौघाचा पूर्वज किंवा पिता एकच असणे यांत कांही विचित्र नाही. पण चौघांचा मुलगाही एकच होता असे कोणी सागू लागल्यास ते नव्या विचाराच्या माणसाला तरी निदान मान्य होणार नाही.
 यावरून असे दिसेल की प्रवर आणि गोत्र यांनी रक्तसंबंध दर्शविला जातो हे खोटे आहे. प्रवर हे कुलातील पूर्वच नसून भिन्नभित्र वैदिक शाखांचे अध्वर्यू होते असे मानण्यास पुष्कळच पुरावा आहे. यज्ञाच्या वेळी यजमान जे प्रवर म्हणत असे ते त्याच्या विद्येच्या शास्त्रांतील गुरूचे दर्शक समजले