पान:विज्ञान-प्रणीत समाजरचना.pdf/१८१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१७५)

पाहिजेत. त्याचे पूर्वज समजण्यामध्ये अनेक अडचणी येतात. शिवाय पूर्वी गोत्रे बदलता येत असत असाही पुरावा मिळतो. शुनःशेप हा आंगिरस गणातून विश्वामित्र गणांत गेला असा उल्लेख आहे. भारद्वाजाच्या वंशज शौनहोत्र हा भृगुकुळांत गेला व त्याने गृत्समदाने रचलेल्या ऋग्वेदाच्या दुसऱ्या मंडलात आणखी एक सूक्ताची भर घातली व आपले नावही बदलून शौनक हे नाव धारण केले अशी कथा आहे.
 मुलगा दत्तक गेला म्हणजे त्याच्या गोत्राबद्दल जे नियम पाळावयाचे असतात ते पाहिले तर प्रवर रक्तसंबंधाचे नसून विद्येसंबंधाचे होते असेच दिसते. चौल व्हायच्या आधी दत्तक दिल्यास मूळ कुळांतले गोत्र अजिबात जाते. चौल झाल्यावर दिला तर दत्तकाच्या स्वतःच्या बाबतीत संबंध करताना जुने व नवे गोत्र पहावे लागते. आणि मुंज झाल्यावर दिला तर मात्र पुढील पिढ्यांनाही दोन्ही गोत्राचा विचार करावा लागतो. यावरूनही प्रवरांच्या बुडाशी रक्ताचा विचार नसून वेदांतील पंथ, विद्येची शाखा यांचा विचार होता असे दिसते. कारण तीनही स्थितीत मुलाचे रक्त तेच आहे. मुंज झाल्यावर गुरु मात्र बदलतो.
 क्षत्रिय, वैश्य वगैरे जातीतील गोत्रे कुलगुरूची गोत्रे आहेत हे कित्येक ठिकाणी अगदीच स्पष्टपणे दिसून येते. तेव्हा तेथे गोत्र रक्तसंबंध दाखविते हे म्हणणेच शक्य नाही.
 सगोत्र विवाहासंबंधीची आरंभीच्या शास्त्रकारांची वृत्ती पाहिली तर त्यांना यात काही भयंकर वाटत होते असे दिसत नाही. सूत्रकाळी चांद्रायण किंवा कृच्छ् प्रायश्चित्त केले की सगोत्र विवाहाचा दोष जात असे. मनूने सगोत्र विवाह नसावा असे सांगितले असले तरी तो करणारास नुसते प्रायश्चित्तही त्याने सांगितलेले नाही. याज्ञवल्क्य, नारद, पराशर, बृहस्पति या स्मृतिकारांच्या मते सगोत्र विवाह फार वाईट आहे. पण तज्जन्य पुत्र ते त्याज्य मानीत नाहीत. यम, बृहद्यम, व्यास, हे उत्तरकालीन स्मृतिकार मात्र त्या स्त्रीला चांडाळी व पुत्राला चांडाळ समजतात. टीकाग्रंथ व निबंधग्रंथ हे तर या विवाहाला वाटेल त्या शिव्या देतात. पण मौजेची गोष्ट अशी की पूर्वीच्यांनी इतके कडक धोरण ठेवलेले नसताना आपण का ठेवतो, हे त्यांनी मुळीच सांगितलेले नाही. पण या वाढत चाललेल्या कडकपणावरून एवढे अनुमान