पान:विज्ञान-प्रणीत समाजरचना.pdf/१८३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१७७)

किंवा आतेमामे नात्यांतले भाऊबहीण एवढेच त्याच्या मनात आहेत. या पलिकडच्या सगोत्र व सपिंड विवाहाला त्यांची मुळीच हरकत नाही. पण In breeding, Cousin Marriages, Marriages of near kin, यांचे विवेचन करता करता हातचलाखी करून तेथेच आपल्याकडचे सपिड व सगोत्र हे शब्द दडपून सगोत्र विवाहाला पाश्चात्य शास्त्रज्ञांचाही विरोध आहे असे दाखविण्याचा उद्योग काही विदूषकी समाजशास्त्रज्ञ करतात. त्यामुळे लोकांनी भ्रमून जाऊ नये इतकेच सांगायचे आहे.
 धर्मशास्त्र व जीवनशास्त्र या दोन्ही दृष्टीने सगोत्र विवाहाचा विचार केला. त्यावरून धर्मशास्त्राच्या निषेधाच्या बुडाशी असलेली कल्पनाच चुकीची आहे आणि जीवनशास्त्राचा याला मुळीच विरोध नाही व त्यामुळे सगोत्र विवाह निषिद्ध मानण्यास मुळीच आधार नाही, हे आपल्या ध्यानात आले. इतके पाठबळ मिळाल्यावर व्यवहाराकडे थोडी दृष्टी टाकण्यास हरकत नाही असे वाटते.
 सध्या ब्राह्मण, मराठे वगैरे जे वर्ग ही गोत्राची बंधने पाळतात त्यांची या बाबतीत अत्यंत कुचंबणा होत आहे, हे सर्वांच्या ध्यानात आलेलेच आहे. काही पोटजातीत आणखी दहा दहा पोटजाती आहेत. त्यात ही सगोत्र सपिंडाची भर. त्यामुळे विवाहात वधूवरांची निवड चांगली करण्यास पुरेसे क्षेत्रच मिळत नाही. काही काही ठिकाणी साठ-सत्तरपेक्षा जास्त घरेच नसतात. त्यामुळे जी मुलगी मिळेल ती पत्करावी लागते. त्यात शिवाय पत्रिकेच्या वेडगळ अडचणींची भर आहेच. यामुळे अनुरूप वधूवरांचा विवाह होण्यास अवकाशच नाही. वय, संस्कृती, शिक्षण यांतील सादृश्य, आरोग्य, या विवाहांतील मुख्य विचारांना या उपटसुंभ विचारांपुढे स्थानच मिळत नाही. आणि त्यामुळे असल्या विवाहाने पति-पत्नींना सुख तर होत नाहीच, पण संततीवरही वाईट परिणाम होतो. तेव्हा सगोत्र, सपिंड, समसंस्कृति असतानाही पाळले जाणारे जातिभेद, या प्रकारचे सर्व बंध नाहीसे करून वधूवरांच्या निवडीला शक्य तितके जास्त विस्तृत क्षेत्र करून देणे हे आजच्या समाजात अत्यंत अगत्याचे आहे.
 विवाहाचा आदि हेतु, एकनिष्ठा, शाश्वतता, संतती, अपत्य संगोपन, स्त्री-स्वातंत्र्य, विवाहाचे वय, पुनर्विवाह, प्रेमविवाह, घटस्फोट, स्त्रीचे