पान:विज्ञान-प्रणीत समाजरचना.pdf/१८६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१८०)

राष्ट्रांचे आमूलाग्र पश्चिमीकरण झाले आहे. राजकारण, व्यापार, शिक्षणसंस्था, युद्धशास्त्र, विज्ञानाचा अभ्यास इत्यादि राष्ट्रीय जीवनाच्या बहुतेक सर्व शाखांत या लोकांनी युरोपी धोरण अंगीकारले आहे. केमालपाशाने तर सामान्य आचारविचारात सुद्धा कायद्याच्या सक्तीने युरोपीयता आणून सोडली आहे. याचा अर्थ असा की युरोपी मनुष्याशी यांनी टक्कर दिली हे जरी खरे असले तरी युरोपी संस्कृतींशी मात्र त्यांना झगडता आले नाही. वेळीच सावध होऊन तिचा अगदी बिनतक्रार अंगीकार त्यांनी केला. आणि तसे त्यांनी केले म्हणूनच त्यांना मान वर ठेवून जगता आले.
 पश्चिमेने पूर्वेवर हा जो अलौकिक विजय मिळविला आहे त्याच्या बुडाशी पश्चिमेजवळ असलेल्या तोफा, विषारी धूर किंवा विमाने हीच आहेत असे वरवर पाहाता वाटते. पण खोल विचार केला तर असे ध्यानात येईल की तोफा व विमाने ही केवळ बाह्य चिन्हे आहेत. तेवढीच निराळी काढून पूर्वेच्या हातात दिली तर पूर्वेला जय मिळेल हे खरे नाही. या तोफा व ही विमाने यांची पाळेमुळे फार फार खोलवर गेलेली आहेत. काही विशिष्ट प्रकारची समाजरचना, विशिष्ट प्रकारची विचारपद्धती, जगाबद्दलची अगदी निराळी दृष्टी, इतकेच नव्हे तर धर्म, नीती, सौंदर्य, संपत्ती, यांहीबद्दलचा निराळा दृष्टिकोन, येथपर्यंत त्या तोफांचा व विमानांचा संबंध जाऊन पोचतो. म्हणजे पूर्व आणि पश्चिम यांच्यात तोफांचा अभाव व अस्तित्व एवढाच फरक नसून या दोघींच्या जीवनाच्या धाग्याधाग्यांत आढळून येईल असा तो फरक आहे. हा फरक काय आहे. कोणच्या मूलतत्त्वावर हा फरक झालेला आहे, आपल्याकडची सनातन म्हणून ठरलेली तत्त्वे टाकून देऊन त्यांचा अंगीकार करणे कितपत इष्ट आहे, तुर्कस्थान व जपान यांच्या यशाचे बीज त्यातच आहे असे म्हणतात त्यात कितपत तथ्य आहे. आणि त्यात खरोखरीच काही तथ्य असल्यास आपण त्यामुळे कोणचे धोरण आखले पाहिजे इत्यादि प्रश्नांचा या लेखात विचार करावयाचा आहे.
 'प्रयोगनिष्ठा' हे अर्वाचीन युरोपी जीवनाचे मुख्य लक्षण आहे. रसायन पदार्थविज्ञान, इत्यादि विज्ञानाच्या शास्त्रांतच तेथे प्रयोग चालू आहेत असे नाही. तर समाजव्यवस्था, धर्म, नीति, राजकारण, वाङम्, कला इत्यादि मानवी जीवनाच्या प्रत्येक अंगोपांगातही ते चालू आहेत. आणि त्यांचे बरे-