पान:विज्ञान-प्रणीत समाजरचना.pdf/१८७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१८१)

वाईट परिणाम पाहून त्याप्रमाणे निर्णय करण्याची पद्धत तेथे रूढ होऊन गेली आहे.
 या एका प्रयोगनिष्ठेच्या मागे समाजधारणेस अवश्य अशा किती तरी गुणांची मालिका लागलेली दिसते. जुन्या ग्रंथात जे ज्ञान सांगितलेले आहे. जे नीती किंवा धर्म यांचे नियम सांगितलेले आहेत, ते सर्व काळी, सर्व स्थळी, सारखेच लागू पडतील, ही वेडगळ श्रद्धा नाहीशी होणे हे प्रयोगनिष्ठेचे पहिले प्राणतत्त्व होय. त्यावाचून नवीन प्रयोग करून पाहणे याला अर्थच उरत नाही. पृथ्वीचा गोलपणा, तिचे भ्रमण, जीवाची उत्पत्ती इत्यादिबद्दल बायबलात सांगितलेले ज्ञान चूक आहे असे वाटल्यामुळेच गॅलिलिओ, कोपर्निकस, डार्विन इत्यादि शास्त्रज्ञांना नवीन ज्ञान मिळविण्याची बुद्धी झाली. रोगांच्या कारणांची जुनी मीमांसा चूक आहे असे वाटल्यानेच डॉ. पाश्चर याने रोगजंतूंचा तलास लावण्याचा प्रयत्न केला व जंतू हे रोग होण्यास मुख्य कारण होतात. हे नवीन ज्ञान जगाला सांगितले. विज्ञानाप्रमाणे इतर प्रत्येक बाबतीत घडामोडी चालू आहेत. राजशाही, लोकशाही, पक्षशाही, हुकूमशाही इत्यादि नवे प्रकार राज्यव्यवस्थेसाठी लोक चोखाळून पाहत आहेत. फ्रेंच राज्यक्रांतीतून निघालेल्या व वेदवत् मानल्या गेलेल्या तत्वांची हीच स्थिती आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता ही तत्त्वे काही दिवस प्रभावी ठरली होती. मध्यंतरी वंशशास्त्राचा अभ्यास सुरू होऊन या तत्त्वांना बराच बायबंद बसला. काही ठिकाणी आनुवंशावर सर्व समाज हालत आहे असे वाटल्यामुळे त्यावर भर दिला गेला. तेथूनही काही पंडित आता लोकांना ढासळवीत आहेत. अर्थामध्ये सर्व सुखदुःखाचे मूळ आहे असे वाटून त्याअन्वये काही देशात समाजरचना चालू आहे. शिक्षणशास्त्रातही अशाच घडामोडी नित्य चालू आहेत. डाल्टनप्लॅन विनेटकाप्लॅन, प्रॉजेक्टमेथड, हॉवर्डप्लॅन, रोज नित्य नवी पद्धत- जास्त सुलभ, जास्त कार्यक्षम पद्धत- विचारी लोक हुडकून काढीत आहेत आणि जुनी त्याज्य म्हणून टाकून देत आहेत. हे मोठे विषय सोडून देऊन अगदी सामान्य विषयाकडे जरी लक्ष दिले, तरी तेच दिसेल. घर बांधण्याच्या पद्धती, पोषाखाच्या पद्धती यांहीमध्ये आमूलाग्र फरक पडत चालला आहे. अलिकडे तर प्रयोगाने नित्य पालटणे हेच जीवनाचे मुख्य लक्षण तेथे होऊ पहात आहे. कालची मोटार आज चालत नाही, कालची बंदूक आज रद्द ठरते व कालचे