पान:विज्ञान-प्रणीत समाजरचना.pdf/१८८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१८२)

सिनेमाचे यंत्रही आज मागे पडलेले दिसते; आणि कालची बंदूक, मोटार, किंवा शिक्षणपद्धती आज नकोशी वाटते त्याचे कारण, केवळ नवीनतेची होस हे नसून ती बंदूक, मोटार किंवा शिक्षणपद्धती कमी कार्यक्षम आहे व नवीन पद्धत ही जास्त कार्यक्षम होईल असा भरंवसा वाटतो, हे आहे.
 जुने ग्रंथ किंवा पंडित हे सर्वज्ञ होते ही समजूत जाणे हे प्रयोगनिष्ठेला जितके आवश्यक आहे. तितकेच नवीन ज्ञान सांगण्याची व स्वीकारण्याची तयारी असणे हेही आवश्यक आहे. या बाबतीत असे दिसते की बहुजन समाजाची प्रवृत्ती सगळीकडे सारखीच असते. नव्या गोष्टीला पूर्वेकडे जितका तीव्र विरोध होतो तितकाच पश्चिमेकडे होते. पंधरासोळाव्या शतकापर्यंत पूर्वपश्चिमेची स्थिती या बाबतीत जवळजवळ सारखीच होती. किंबहुना पश्चिमेकडे ती जास्त भयंकर होती. कारण बायबलविरुद्ध ब्र काढल्याबरोबर तिकडे जाळून टाकीत असत. पण पूर्वेकडे मुख्य उणीव पडली ती नवी संशोधन करून आलेले निर्णय लोकांपुढे निर्भयपणे ठासून मांडणाऱ्या शूर पुरुषांची कोपर्निकस, गॅलिलिओपासून न्यूटन- डार्विनपर्यंत शेकडोशवीरांनी आपल्या रक्ताचे व प्राणाचेही मोल देऊन नवीन ज्ञानाचा नंदादीप पाजळत ठेवला. ती परंपरा पूर्वेकडे निर्माणच झाली नाही इतकेच नव्हे तर संतवाङमयात भौतिक ज्ञानाची, तर्कशास्त्राची, पांडित्याची, टवाळीच करण्याची प्रथा पडली होती. आता यावरून समाज जुन्या श्रुतिस्मृतींना सर्वस्वी चिकटून राहिला होता असे वाटण्याचा संभव आहे. पण तेही खरे नाही. आपापल्या सुखसोयीस व क्वचित् समाजाच्या सुखसोयीसही अनुकूल असे बदल येथल्या काही समाजधुरीणांना केलेले दिसतात; पण तसे करताना जुन्या ग्रंथांची गुलामगिरी तोडून टाकण्याचा प्रयत्न तर त्यांनी केला नाहीच; पण आपल्या म्हणण्यास ते अनुकूलच आहेत असे दाखविण्याचा अश्लाघ्य व विघातक प्रयत्न मात्र त्यांनी केला. बुद्धीला पिरगळून टाकून शब्दनिष्ठ होण्याचा प्रयत्न केला की हा अनिष्ट परिणाम टाळताच येणार नाही. रेननने म्हटलेच आहे की माणसाचा स्वभाव बदलणे शक्य नाही. त्याला ग्रंथाला जखडून टाकलेत तर त्या ग्रंथावर आपल्याला अनुकूल असे भाष्य लिहून तो त्यांतून सुटून जाणार हे ठरलेच आहे तीच स्थिती पूर्वेकडच्या पंडितांची झाली. आणि त्यातूनच 'समन्वया'चा जन्म झाला. या समन्वयपद्धतीने हिंदुस्थानची किती बौद्धिक हानी झाली